कल्याण-डोंबिवलीत २७ गावांमध्ये घरांच्या नोंदणीला वेग; बेकायदा असल्याच्या आरोपानंतर नोंदणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 02:02 AM2019-03-24T02:02:22+5:302019-03-24T02:02:35+5:30
कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावांमध्ये घरांची नोंदणी नुकतीच सुरू झाली आहे. ही नोंदणी गेल्या १४ महिन्यांपासून बंद असल्याने बांधकाम व्यावसायिक हैराण झाले होते. पण आचारसंहितेचे बिगुल वाजताच आठवडाभरापासून तेथे नोंदणी सुरू झाली आहे.
मुंबई : कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावांमध्ये घरांची नोंदणी नुकतीच सुरू झाली आहे. ही नोंदणी गेल्या १४ महिन्यांपासून बंद असल्याने बांधकाम व्यावसायिक हैराण झाले होते. पण आचारसंहितेचे बिगुल वाजताच आठवडाभरापासून तेथे नोंदणी सुरू झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांमध्ये विविध प्रकल्पांत बांधकाम व्यावसायिकांची गुंतवणूक अडकून पडली आहे. त्यातच नोंदणी बंद असल्याने सदनिका खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले होते. मात्र आठवडाभरापासून सुरू असलेल्या दस्तनोंदणीमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महिनाभर हा वेग कायम राहणार असून त्यानंतर पुन्हा स्थिती जैसे थे होईल.
ज्या नोंदणीकृत कार्यालयात काम सुरू आहे, तेथे प्रत्येकी ७२ हजार रुपये वसूल केले जात असल्याचा आरोप मनसेतर्फे केला जात आहे. या सर्व नोंदणी बेकायदा असून ही सर्व बांधकामे बेकायदा ठरणार असल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार आहे. हे सारे व्यवहार शंकास्पद असून मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दखल घेण्याची मागणी मनसेने केली.
याबाबत तक्रारदार पुढे आलेला नाही. तसेच ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांमधला व्यवहार अधिकृत आहे की नाही याबाबत कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही. त्यामुळे जी नोंदणी सुरू आहे त्या बांधकामांना भविष्यात एकप्रकारे अभयच मिळणार असल्याचे जाणकार सांगतात. तर २७ गावांमधील घरांची नोंदणी सुरू व्हावी यासाठी गुलाब वझे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ नोव्हेंबर २०१८ रोजी गांधीनगर येथील निबंधक कार्यालयानजीक आंदोलन केले होते.
२७ गावांमधील घरांच्या खरेदी-विक्री संदर्भातील नोंदणी व्यवहार आधीही सुरूच होते. जे व्यवहार होतात त्या कागदपत्रांची छाननी होते आणि त्यानंतरच जे कागदपत्र योग्य असतील त्यांचे व्यवहार होत आहेत.
- मजोज वावीकर,
जिल्हा सहनिबंधक, ठाणे