भिवंडीमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी तीन महिन्यांसाठी केली माफ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:05 AM2020-08-20T01:05:18+5:302020-08-20T01:05:24+5:30
लॉकडाऊनच्या तीन महिन्यांकरिता घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा महापौर प्रतिभा पाटील यांनी बुधवारी ऑनलाइन महासभेत केली.
भिवंडी : कोरोनामुळे भिवंडीतील नागरिक, व्यापारी, उद्योजक, यंत्रमागधारक यांचे आर्थिक नुकसान झाले असल्याने त्यांना दिलासा देण्याकरिता लॉकडाऊनच्या तीन महिन्यांकरिता घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा महापौर प्रतिभा पाटील यांनी बुधवारी ऑनलाइन महासभेत केली.
महासभेच्या विषयपत्रिकेत कोरोना व लॉक डाऊन काळातील तीन महिन्यांचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याचा विषय प्रस्तावित होता. स्थायी सभापती हलीम अन्सारी यांनी चर्चेला सुरुवात करताना करमाफीची मागणी केली व त्यास सभागृह नेता विलास पाटील यांनी अनुमोदन दिले. महापौर म्हणाल्या की, कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉक डाऊनच्या काळात शहरातील व्यापारी, नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून येणारे नाही. शहरातील नागरिकांना थोडासा आर्थिक दिलासा देण्याकरिता लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळातील मालमत्ता व पाणीपट्टी कराची माफी देत आहोत. प्रशासनाने महासभेच्या या निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश महापौरांनी दिले. शहरातील नागरिक, सेवाभावी संस्था, मोहल्ला क्लिनिक सुरू करणारे वैद्यकीय व्यावसायिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याबद्दल महापौरांनी समाधान व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले.