लक्षणे नसल्यास घरीच उपचार; ठाणे महापालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 12:54 AM2020-05-25T00:54:18+5:302020-05-25T00:54:32+5:30
वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्राच्या नियमांचा आधार
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, यापुढे कोणतीही लक्षणे नसणाऱ्या बाधितांवर त्यांच्या घरातच उपचार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचा भार काही प्रमाणात हलका होणार असला तरी दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये मात्र अशा उपचारांना मर्यादा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकीकडे ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट, मुंब्रा, मानपाडा, लोकमान्यनगर आणि नौपाडा या प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २२ मे रोजी एकाच दिवशी १९७ रुग्णांची भर पडली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्थेवरही प्रचंड ताण आला आहे.
सध्या शहरात तीन हजार खाटांची निर्मिती करण्यात आली असून येत्या काही दिवसांमध्ये पालिका प्रशासनाकडून १० हजार खाटांची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे ८५ टक्के रुग्णांमध्ये खोकला, ताप, सर्दी अशी कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांच्या तपासणीचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. अशा रुग्णांना जर त्यांचा स्वत:चा बंगला अथवा दोन बेडरूमचा फ्लॅट असेल तर त्यांच्यावर घरातच उपचाराचे नियोजन केले जात आहे. ज्या रुग्णांना लक्षणांसह जास्त प्रमाणात त्रास असेल, त्यांनाच शक्यतो रुग्णालयांमध्ये दाखल केले जाणार असल्याचे महापालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
वाढती रुग्णसंख्या आणि त्याप्रमाणात अपुरी पडणारी रुग्णालये पाहता या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी होणार आहे. परंतु, दाटीवाटीच्या वस्ती तसेच झोपडपट्टी परिसरातील वाढत्या रुग्णांवर ही उपचारपद्धती लागू करण्यात अनेक अडचणी असल्याचे एका वैद्यकीय अधिकाºयाने सांगितले. त्यामुळे वागळे इस्टेट, मुंब्रा, लोकमान्यनगर, रायलादेवी आणि मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रांतील अशा रुग्णांवर पालिका प्रशासन कशा प्रकारे उपचार करणार, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या ८५ टक्के रुग्णांना लक्षणे आणि त्रासही नाही, अशांवर सोय असल्यास घरातच उपचार केले जाणार आहेत. मुळात, कोरोना झाल्यानंतर उपचाराबरोबरच त्याच्यापासून अन्य कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. आरोग्य सेतू डाउनलोड करून त्यानुसार हे उपचार केले जातील. पण, ज्याला जास्त त्रास असेल, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
- अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका