ऑनलाइन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांची घरीच शिकवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:38 AM2020-07-22T00:38:14+5:302020-07-22T00:38:33+5:30
सरावासाठी साप्ताहिक पुस्तिकाही तयार केली आहे.
सुरेश काटे
तलासरी : कोरोनामुळे सगळेच ठप्प झाले आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांच्याकडे नेट आणि आॅनलाइन शिक्षणासाठी उपकरणे आहेत, त्यांचे शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, ज्यांच्याकडे काहीच सुविधा नाही त्यांचे काय, असा प्रश्न होता. तलासरी तालुक्यातील शिक्षकांनी या मुलांचेही शिक्षण थांबवलेले नाही. अशा मुलांच्या घरी जाऊ न त्यांना शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. तसेच, सरावासाठी साप्ताहिक पुस्तिकाही तयार केली आहे.
१५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून राज्य शासनाने अध्यादेश काढून ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाद्वारे सर्व शिक्षक ‘वर्क फ्रॉम होम’साठी झपाटून कामाला लागले आहेत. तलासरी तालुक्यातील सर्व १५४ शाळा बंद आहेत. मात्र, येथील शिक्षकांनी विविध मार्गांनी ज्ञानार्जनाचे काम सुरू ठेवले आहे. प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गाचे व्हाट्सअॅप ग्रुप बनवले आहेत. या ग्रुपद्वारे विविध प्रकारचे अॅप्स पालकांना डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. त्याद्वारे तसेच पीडीएफ पाठवून अध्यापनाचे काम सुरू आहे. काही पालकांकडे अॅण्ड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे त्या मुलांची समस्या शिक्षकांना सतावत होती. त्यांच्यासाठी एक साप्ताहिक छोटीशी स्वाध्याय पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
गरीब मुलांसाठी उपयुक्त : जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी नुकतीच तलासरी तालुक्याला भेट दिली. वृक्षारोपण, पटनोंदणी व शाळा बंद, पण शिक्षण सुरू या कार्यक्रमाचा आढावा घेऊन सर्व शिक्षकांचे कौतुक केले. जोपर्यंत शाळा चालू होणार नाहीत, तोपर्यंत हे शिक्षण असेच चालू राहील, असा निर्धार तालुक्यातील सर्व शिक्षकांनी केला आहे.