कल्याण-डोंबिवलीत १ मेपासून घरगणती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:33 AM2019-12-31T00:33:53+5:302019-12-31T00:34:00+5:30
आयुक्तांकडून आढावा; फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रत्यक्ष जनगणना, मसुरी येथे झाले होते प्रशासकीय प्रशिक्षण
कल्याण : जनगणनेच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका सज्ज झाली आहे. १ मे ते १५ जून २०२० दरम्यान पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार केली जाणार आहे. तर, त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना २०२१ मध्ये फेब्रुवारीत केली जाणार आहे. या जनगणना कार्यक्रमाचा आढावा सोमवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतला.
मसुरी येथील प्रशासकीय प्रशिक्षणानंतर बोडके यांनी महापालिकेतील कामाचा साप्ताहिक आढावा सोमवारी महिनाभरानंतर घेतला. यावेळी जनगणनेच्या कामावर अधिक भर देण्यात आला. जनगणनेच्या कामसाठी मालमत्ता विभागाचे करसंचालक विनय कुळकर्णी यांना पुण्यातील यशदा प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. सहा दिवसांच्या प्रशिक्षणानंतर कुळकर्णी यांनी जनगणनेच्या कामाची माहिती आयुक्तांच्या बैठकीत दिली.
२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिका हद्दीत २७ गावे धरून १५ लाख लोकसंख्या होती. त्यानंतर, आता २०२१ मध्ये जनगणना होणार आहे. मागील १० वर्षांतील लोकसंख्यावाढीचा दर पाहता, महापालिका हद्दीत २०११ च्या १५ लाखांच्या लोकसंख्येत पाच लाखांनी वाढ अपेक्षित आहे.
महापालिका हद्दीतील जनगणनेसाठी तीन हजार प्रगणक आणि ५०० पर्यवेक्षक नेमले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका कर्मचारी, महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, खाजगी व अनुदानित, विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
जनगणनेच्या आधी १ मे ते १५ जून २०२० या ४५ दिवसांच्या कालावधीत महापालिका हद्दीतील घरांची यादी तयार केली जाईल. तसेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अद्ययावत केले जाईल. २०११ च्या जनगणनेनंतर २०१५ मध्ये रजिस्टर अद्ययावत करण्यात आले होते. मुख्य गणना अधिकारी म्हणून बोडके हे काम पाहतील. तर, शहर गणक म्हणून सामान्य प्रशासन उपायुक्त हे काम पाहतील. महापालिकेतील १० प्रभाग क्षेत्रांमधील १० प्रभाग अधिकाऱ्यांना चार्ज अधिकारी म्हणून काम पाहावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रगणकाचे गट तयार केले जाणार आहेत.
त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागातील सर्व्हेअर व लिपिक घेतले जाणार आहेत. एका गटात १५० कुटुंबे असतील. त्यांची लोकसंख्या किमान ७५० अशी असेल. प्रत्येक गटासाठी एक पर्यवेक्षक असेल. या गटांमार्फत इमारती व घरे यांना अनुक्रमांक दिले जाणार आहेत. जनगणनेचे काम प्रत्यक्ष लेखी स्वरूपात व अॅपद्वारे असे दोन्ही प्रकारे केले जाणार आहे. घरयादी तयार करून झाल्यावर प्रत्यक्ष शिरगणतीचे काम १ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान केले जाणार आहे.
लोकसंख्या आणि विकासाचे गणित मांडून राबवणार विकास योजना
महापालिकेतील लोकसंख्या लक्षात घेऊन विकास योजना आखल्या जातात. २० लाख लोकसंख्येच्या दृष्टीने पुढील नियोजन केले जाईल. तसेच या योजना राबविताना २० लाखांची लोकसंख्या आधारभूत धरली जाईल. गेल्या १० वर्षांत महापालिका हद्दीत पाच लाखांनी लोकसंख्या वाढली असेल, तर त्याचा ताण महापालिकेच्या नागरी सोयीसुविधांवर निर्माण झालेला आहे, हेही तितकेच खरे आहे.
पाणीयोजना, मलनि:सारण, वाहतूक प्रश्न, घरांचे प्रश्न, खेळाच्या जागा, आरोग्यसेवा सुविधा, सुरक्षितता या विविध सेवांवर लोकसंख्यावाढीचा ताण पडतो. बेकायदा बांधकामांमुळे नियोजनाचा बोजवारा उडतो. मात्र, लोकसंख्या वाढलेली दिसून येते. नागरिकीकरण होऊन वस्ती दाट झाल्याचे दिसून येते. लोकसंख्येची घनता वाढीस लागलेली दिसून येत असली, तरी विकासाच्या योजना त्या प्रमाणात दिसून येत नाहीत.