गृहविलगीकरणातील रुग्णांचा कचरा उचललाच जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:42 AM2021-05-21T04:42:45+5:302021-05-21T04:42:45+5:30

ठाणे : ज्या रुग्णांना सौम्य किंवा लक्षणेच नसतात, अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. परंतु, त्यांच्याकडे निघणारा ...

Homeless patients are not picked up | गृहविलगीकरणातील रुग्णांचा कचरा उचललाच जात नाही

गृहविलगीकरणातील रुग्णांचा कचरा उचललाच जात नाही

Next

ठाणे : ज्या रुग्णांना सौम्य किंवा लक्षणेच नसतात, अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. परंतु, त्यांच्याकडे निघणारा जैविक कचरा उचलला जात असल्याचा दावा महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने केला होता. परंतु, त्यांचा हा दावा बुधवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी फोल ठरवला. अशा रुग्णांच्या घरांतील कचरा उचलला जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे कचरा गोळा केला जात नसेल, तर संबंधित संस्थेला बिल का द्यायचे, असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यामुळे या संस्थेच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

कोरोना रुग्णांच्या कचऱ्याचे निर्मूलन करण्याचे काम मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि मे. एन्व्हायरो व्हीजील या दोन संस्थांना ६ महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात आले आहे. यासाठी १ कोटींच्या खर्चाला मान्यतादेखील देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांना अनुक्रमे ५० लाखांच्या कामांचा कार्यादेश देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर आणि आयसोलेशन सेंटर्समध्ये निर्माण होणारा कचरा संकलित करून या कचऱ्याचे निर्मूलन करण्याची जबाबदारी मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या संस्थेवर देण्यात आली आहे. अँटिजन टेस्ट सेंटर्स आणि होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांकडून कचरा संकलित करण्याचे काम एन्व्हायरो व्हीजील या संस्थेला देण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दोन्ही संस्थांचा १ कोटी ५० लाखांचा वाढीव बिलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आल्यानंतर एन्व्हायरो व्हीजील संस्थेच्या कारभारावरच नगरसेवकांकडून टीका करण्यात आली.

शिवसेनेच्या नगरसेविका रुचिता मोरे, नगरसेवक विकास रेपाळे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांकडून कचरा उचललाच जात नसल्याची माहिती सभागृहात उघड केली. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण अधिकारी मनीषा प्रधान यांनी होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांकडून कचरा संकलित करण्यासाठी मेडिकलची टीम तसेच एक गाडी प्रभागात फिरत असल्याची माहिती दिली. या मेडिकल टीमकडून घरी असणाऱ्यांसाठी कचऱ्यासाठी पिशव्यादेखील देण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, आतापर्यंत रुग्णांकडून किती कचरा संकलित केला, असा सवाल विकास रेपाळे यांनी केल्यानंतर मनीषा प्रधान यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. मार्च ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत एकूण १२ हजार ७८० किलो कचरा संकलित करण्यात आला असल्याचे प्रधान यांनी सांगितले. मात्र, होम आयसोलेशनमधील रुग्णांकडून किती कचरा संकलित केला, याची माहिती प्रधान यांना देता आली नाही. दुसरीकडे नगरसेवकांकडेच कोणीही फिरकले नाही, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी सदरचा प्रस्ताव तहकूब ठेवत असल्याचे जाहीर केले.

.............

मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि मे. एन्व्हायरो व्हीजील या दोन संस्थांची नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीसाठी वाढीव रक्कम अनुक्रमे ४१ लाख १० हजार तसेच १० लाख ६४ अशी एकूण ५४ लाख ७५ हजार एवढी वाढीव रक्कम आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत कोविडचा कचरा संकलित करण्यासाठी आणि निर्मूलनासाठी पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि मे. एन्व्हायरो व्हीजील यांनी ७० लाख आणि २५ लाख अशी एकूण ९५ लाखांची रक्कम आवश्यक असून त्याअनुषंगाने १ कोटी ५० लाख वाढीव खर्चाचा प्रस्ताव महापालिकेने सर्वसाधारण सभेत आणला होता.

Web Title: Homeless patients are not picked up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.