बेघरांनी रात्र काढली रस्त्यावर, बाधितांच्या ‘रस्ता रोको’मुळे रिकाम्या इमारतींवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 02:00 AM2020-01-08T02:00:16+5:302020-01-08T02:00:24+5:30
दिवा येथील अनधिकृत चाळींवर सोमवारी प्रचंड बंदोबस्तात केलेल्या कारवाईत बेघर झालेल्या अनेक कुटुंबीयांना सोमवारची रात्र रस्त्यावर झोपून काढली.
कुमार बडदे
मुंब्रा : दिवा येथील अनधिकृत चाळींवर सोमवारी प्रचंड बंदोबस्तात केलेल्या कारवाईत बेघर झालेल्या अनेक कुटुंबीयांना सोमवारची रात्र रस्त्यावर झोपून काढली. कारवाईत पाडलेल्या घरांकडे बघून अनेकांच्या डोळ््यातील अश्रू अनावर झाले होते.
दिवा येथील अनधिकृत चाळीेंवर सोमवारी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे येथील शेकडो घरे जमीनदोस्त झाली. जीवदानी नगर परिसरातील अनेक ठिकाणी कारवाईनंतर पडलेल्या काँक्रिटच्या ढिगाऱ्याखाली काही संसारोपयोगी वस्तू हाती लागतात का, याचा काही कुटुंबे मंगळवारीही शोध घेत होते. काहींनी त्यांच्या घराचे तुटलेले लोखंडी प्रवेशद्वार, घरातील जर्मनच्या मांडण्याचा ठोक भावात सौदा करु न त्याची भंगारमध्ये विक्री केली. त्यामुळे दिवसभर या परिसरात भंगार विक्रेत्यांची लगबग सुरु होती.
कारवाई करण्यात आलेल्या चाळींमधील घरे स्वस्तामध्ये मिळाल्यामुळे खरेदी केली होती. ती विकत घेताना त्यावर कारवाई होऊन बेघर व्हावे लागेल याची पुसटशीही कल्पना नव्हती, असे भरत शर्मा याने सांगितले. ज्या घरांवर कारवाई करण्यात आली त्यातील अनेक कुटुंबे मागील १० ते १२ वर्षापासून येथे रहात होती. तोडण्यात आलेली घरे अनधिकृत होती, राखीव जागेवर बांधण्यात आली होती तर त्यामध्ये राहणाºया लोकांना विविध सुविधा देणाºया अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले नाही का? त्याचवेळी अनधिकृत बाधकामांवर कारवाई केली असती तर आणखी अनधिकृत बांधकामे झाली नसती, असे सुमन तांडे म्हणाल्या. काहीजण कारवाई झालेल्या परिसरात घिरट्या घालत होते. मातीच्या ढिगाºयांखाली कुणाचे काही राहिले असल्यास ते हडप करण्याकरिता भुरटे चोर फिरत असल्याची तक्रार काहींनी केली. या परीसरात काही चाळींचे बांधकाम केलेल्या सचिन चौबे या विकासकाने बांधलेल्या ज्या खोल्यांवर कारवाई करण्यात आली, त्या खोल्यांमध्ये राहणाºया कुटुंबांची पर्यायी व्यवस्था करणारा असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान बापलेकीच्या जमिनीच्या मालकी हक्कांच्या वादावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येथील वैभव ढाब्याजवळ सुरु असलेल्या दोन अनधिकृत इमारतीवर पोलीस बंदोबस्तामध्ये मंगळवारी कारवाई करण्यात आल्याची माहिती दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुनील मोरे यांनी दिली. घटनास्थळी आलेले आ. राजू पाटील यांनी स्थानिकांना बेघर होऊ देणार नसल्याचे तसेच या परीसराचा समूह विकास योजनेमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी ठामपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले.
>महसूल विभागाने सोमवारी केलेल्या धडक कारवाईमुळे शेकडो कुटुंबे अक्षरश: रस्त्यावर आली. ऐन थंडीच्या दिवसात डोक्यावरील छत हरवल्याने ही कुटुंबे हवालदिल झाली आहेत. हातचा पैसा गेला आणि घरही गेले. आता करावे तरी काय, असा प्रश्न येथील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना घेऊन कुठे जायचे, असा प्रश्नही त्यांनी केला.