तान्हुलीसह बाळंतिणीला भरपावसात केले बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:26 AM2019-09-19T00:26:39+5:302019-09-19T00:26:41+5:30

भाईंदर येथील एका खासगी जागेत पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या रखवालदार कुटुंबास सोमवारी सकाळी साडेसात वाजता भरपावसात महापालिका प्रशासनाने बेघर केले.

Homelessness compensated for childbirth with Tanhuli | तान्हुलीसह बाळंतिणीला भरपावसात केले बेघर

तान्हुलीसह बाळंतिणीला भरपावसात केले बेघर

Next

मीरा रोड : भाईंदर येथील एका खासगी जागेत पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या रखवालदार कुटुंबास सोमवारी सकाळी साडेसात वाजता भरपावसात महापालिका प्रशासनाने बेघर केले. यात नुकतीच बाळंत झालेली महिला आणि तिच्या सात दिवसांच्या तान्हुलीलाही निर्दयीपणाने बेघर करत पालिकेने अमानुषतेचे दर्शन घडवले. या मायलेकीसह वृध्दांनादेखील पोलीस बंदोबस्तात बाहेर खेचून झोपडे पाडण्यात आले.
भार्इंदर उड्डाणपुलाखाली पुष्पलीला इमारतीलगत मुर्धा येथील बाळकृष्ण म्हात्रे कुटुंबियांची पुर्वीपासूनची शेतजमीन असून शेतजमीनीच्या संरक्षणासाठी त्यांनी श्रीराम पवार यांना सुमारे २० वर्षांपासून रखवालदार म्हणून ठेवले आहे.
पवार हे आपली पत्नी जमना, भार्इंदर सेकंडरी शाळेत १० वीत शिकणारी मुलगी पुजा व ९ वीत शिकणारी आरती तसेच ९ वर्षांचा मुलगा प्रसाद यांच्यासह राहतात. त्यांचा मेव्हणा गिरमाजी सुर्यवंशीदेखील पत्नी पुजा, ज्येष्ठ नागरिक असलेले वडील भुजंगराव व आईसोबत गेल्या काही वर्षांपासून एकाच पत्र्याच्या झोपडीत राहतात.
सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास भाजप आमदार नरेंद्र मेहता, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, नगरसेविका वर्षा भानुशाली हे पालिका प्रभाग अधिकारी सुनील यादव यांच्यासह पालिका कर्मचारी व मोठा पोलीस फाटा घेऊन आले. आधी पदपथावरील काही झोपड्या हटवण्यात आल्या. त्यानंतर खाजगी जागेतील पवार - सुर्यवंशी कुटुंबियांचे पत्र्याचे झोपडे घरातील लोकांना बळजबरी हुसकावून पाडण्यात आले. बाहेर पाऊस पडतोय, घरात ७ दिवसांचे बाळ व बाळंतीण आहे. शाळेत शिकणाºया मुली व वृध्द आहेत, अशा विनवण्या त्यांनी केल्या. घरात सामान आहे. त्यामुळे एक दिवसाची मुदत देण्यास सांगितले. परंतु आमदार, नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. घरात गॅसवर बाळंतिणीसाठी पेय उकळत ठेवले होते. तेदेखील गॅस बंद करुन बाहेर काढले.
भरपावसात बाळ आणि बाळंतीणीला पाहून याच भागात राहणारे ६५ वर्षांचे रहिवासी राजेंद्र शाह यांचे काळीज हेलावले. त्यांना राहवले नाही आणि त्यांनी बाळ - बाळंतिणीला आपल्या सदनिकेत राहण्याची तसेच जेवण आदीची व्यवस्था करुन दिली. शाह यांनी महापालिकेची ही कारवाई अमानविय असल्याचे म्हटले.
दुपारी शाळेतून आलेल्या पुजा आणि आरती यांना आपले उध्वस्त घर पाहुन रडुच कोसळले. आजही या कुटुंबियांचे सामान उघड्यावर आहे. बाळंतीण झालेल्या पुजा आपल्या ७ दिवसांच्या तान्हुलीला घेऊन डोक्यावर छप्पर मिळणार का, या विवंचनेत आहेत. वृध्द सुर्यवंशी दाम्पत्य रस्त्याच्या कडेला भरपावसात रात्र काढत आहेत.
वास्तविक पावसाळ्यात राहती घरं न तोडण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. पालिका अधिकारी शासनाच्या या आदेशाचा हवाला देत शहरात राजरोस चालणारी बेकायदा बांधकामे पाडत नाहीत. पण येथे मात्र भरपावसात, तेही चक्क
सकाळी साडेसात वाजता मोठ्या ताफ्यासह जाऊन पालिकेने कारवाई केली.
>संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
आ. मेहतांनी मात्र, आपला नवरात्री उत्सव आहे म्हणून नव्हे तर रहिवाशांच्या मागणीवरुन पालिकेने तोडक कारवाई केली आहे. अनधिकृत घर, झोपडे असेल तर कारवाई होईल, असे म्हटले आहे. पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी या प्रकरणाची चौकशी अतिरीक्त आयुक्तांना करण्यास सांगितल्याचे म्हटले आहे.
खाजगी जागेत जुने झोपडे असूनही भरपावसात महापालिका प्रशासन व आमदार, नगरसेवकांनी कारवाई करायला लावली. यात बाळंतीणीसह ७ दिवसांच्या नवजात बाळास तसेच शाळेत शिकणाºया मुलींनादेखील निर्दयीपणे बेघर करणे हा अमानुषपणा असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक, झारा मर्चंट, ममता अधिकारी, शोभा महाजन, राजश्री वेलदर, भावना तिवारी यांच्यासह माधवी गायकवाड, शिबानी जोशी, भारती त्रिवेदी आदिंनी केला आहे. त्यांनी या सर्वांवर कठोर कारवाईची मागणी करतानाच बाळ - बाळंतीण व विद्यार्थींनीसह पालिका आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण आयुक्त उपलब्ध नव्हते.

Web Title: Homelessness compensated for childbirth with Tanhuli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.