वृत्तपत्र विक्रीला गृहसंकुलांनी सहकार्य केले पाहिजे- सिताराम राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 01:12 AM2020-06-06T01:12:03+5:302020-06-06T01:32:06+5:30
वृत्तपत्र विक्रीला शासनाने परवानगी दिलेली असतांना काही ठिकाणी सोसायटयांमधून वृत्तपत्र वितरणाला बंदी घातली जात आहे. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असल्यामुळे वाचकांनी त्याचा आदर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना गृहसंकुलांमध्ये प्रवेश देऊन सहकार्य करावे, असे आवाहन राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्य शासनाने घरोघरी वृत्तपत्र विक्रीला आता परवानगी दिली आहे. तरीही काही ठिकाणी सोसायटयांमधून वृत्तपत्र वितरणाला बंदी घातली जात आहे. अशी वृत्तपत्र विक्रीची अडवणूक कोणीही करु नये. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी केले आहे.
आपल्या पत्रात राणे यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने ८ जून पासून शहरांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत घातलेले निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे ठाणे, मुंबई, पुणे अशा महानगरांमध्येही काही प्रमाणात कामकाज सुरु होणार आहे. अनेक भागांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता दुकानेही सम विषम या तारखांनुसार सुरु ठेवण्याला परवानगी दिली आहे. या सर्व निर्णयांबरोबरच राज्य शासनाने वृत्तपत्र घरोघरी वितरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे रविवारी ७ जून पासून वृत्तपत्र विक्रेते घरोघरी जाऊन वृत्तपत्र वितरीत करणार आहेत. शासनाने वृत्तपत्र घरपोच वितरणासाठी आदेश दिलेले असल्यामुळे त्यात गृहनिर्माण संस्थांना अडथळा आणता येणार नाही. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असल्यामुळे वाचकांनी त्याचा आदर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांनी आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अशा वृत्तपत्र विक्रेत्यांना गृहसंकुलांमध्ये प्रवेश देऊन सहकार्य करावे. हे करतांना विक्रेते, वृत्तपत्र वितरक आणि गृहसंकुलांनीही त्यासाठी आवश्यक त्या खबरदारी घ्याव्यात, असे आवाहन राणे यांनी केले आहे.