ठाण्याच्या वाहतूक पोलिसाच्या प्रामाणिकपणामुळे तरुणीला मिळाला मोबाइल
By जितेंद्र कालेकर | Published: October 12, 2019 09:19 PM2019-10-12T21:19:30+5:302019-10-12T21:28:06+5:30
ठाण्यात रिक्षाने प्रवास करतांना प्रज्ञा दाभाडे या तरुणीचा गहाळ झालेला मोबाईल आणि काही रोकड वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार जयराम खादे यांना मिळाला. तो त्यांनी शनिवारी (१२ आॅक्टोंबर रोजी) या तरुणीला परत केल्याने खादे यांचे पोलीस वर्तुळात कौतुक होत आहे.
ठाणे : एरव्ही, वाहतूक पोलिसांवर सर्रास भ्रष्टाचाराचा आरोप होत असतो. नियम मोडणा-या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली, तरी ते टीकेचे धनी होतात. अशा सर्वच चर्चांना नौपाडा वाहतूक उपविभागाचे पोलीस हवालदार जयराम खादे यांनी छेद दिला आहे. नौपाडा भागात पॉइंटतपासणी करीत असताना रस्त्यावर मिळालेला एक मोबाइल आणि काही रोकड त्यांनी प्रज्ञा दाभाडे (१९) या तरुणीला शनिवारी सुखरूप परत केल्याने तिने समाधान व्यक्त केले.
उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी भागात राहणारी प्रज्ञा ही १२ आॅक्टोबर रोजी ठाणे रेल्वेस्थानक येथून वागळे इस्टेट येथे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कामावर जात होती. ती रिक्षाने जात असताना गुरु द्वारासमोरील रस्त्यावर तिचा सुमारे १५ हजारांचा मोबाइल आणि १४० रुपयांची रोख रक्कम हातातून निसटली. त्यानंतर अवघ्या काही वेळाने तिथून नौपाडा वाहतूक शाखेची पोलीस जीप तिथून पॉइंटतपासणीसाठी जात होती. वाहन चालविताना चालक पोलीस हवालदार खादे यांची नजर या मोबाइलवर गेली. रस्त्यावर मिळालेला मोबाइल आणि रोकड त्यांनी ताब्यात घेऊन तीनहातनाका येथील आपल्या वाहतूक विभागाच्या कार्यालयात जमा केली. त्यानंतर, मोबाइलच्या आधारे दाभाडे हिच्याशी संपर्क करून तिचा मोबाइल आणि रोकडही त्यांनी नौपाडा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांच्या उपस्थितीमध्ये तिला सुपूर्द केला. दाभाडे यांचे पोलीस वर्तुळात कौतुक होत आहे.