भिवंडीतील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षात विसरलेला महागडा मोबाईल प्रवाशाला केला परत
By नितीन पंडित | Published: April 13, 2023 04:38 PM2023-04-13T16:38:39+5:302023-04-13T16:38:59+5:30
भिवंडी : रिक्षात एखादी महागडी वस्तू अनवधानाने विसरून गेलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. पण काही रिक्षा चालकांच्या प्रामाणिक ...
भिवंडी: रिक्षात एखादी महागडी वस्तू अनवधानाने विसरून गेलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. पण काही रिक्षा चालकांच्या प्रामाणिक पणामुळे अशा प्रवाशांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यात यश मिळते आणि अशीच घटना भिवंडीत घडली आहे.
बुधवारी सकाळी अकरा वाजता सुमारास एस टी स्टँड परिसरात रिक्षा चालविणारा रिक्षा चालक सलीम शेख यास रिक्षामध्ये एक ॲपल कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला. तो फोन कोणाचा हे शोधणे जिकरीचे असल्याने रिक्षा चालक सलीम शेख याने निजामपूर पोलीस ठाण्याचे गस्तीवरील पोलीस शिपाई सोनवणे यांना ही माहिती देवून मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला.
निजामपूर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने मोबाईल मालकाचा शोध घेवून तो कल्पीत सचिन गोले रा.गौरीपाडा, यांचा असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी मोबाईल मालका सह रिक्षा चालक सलीम शेख यास बोलवून ७५ हजार रुपयांचा महागडा मोबाईल परत केला .तर प्रामाणिक रिक्षा चालकाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.