ठाण्याच्या प्रवाशाचा प्रामाणिकपणा: रिक्षात राहिलेले अन्य प्रवाशाचे दागिने केले परत
By जितेंद्र कालेकर | Published: July 13, 2018 09:43 PM2018-07-13T21:43:25+5:302018-07-13T21:56:50+5:30
रिक्षात घरी जाण्यासाठी बसल्यानंतर एक बॅग विठ्ठल चिंचोलकर यांना मिळाली. यात मोबाईल आणि सोनसाखळी होती. ती रिक्षा चालकाचीही नसल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी ती नौपाडा पोलिसांच्या मार्फतीने संबंधिताला परत केली.
जितेंद्र कालेकर
ठाणे: रिक्षा चालक आणि विठ्ठल चिंचोळकर या प्रवाशाच्या प्रामाणिकपणामुळे दयानंद कांबळे या अन्य एका प्रवाशाचा मोबाईल आणि दीड तोळयांची सोन्याची चैन असलेली बॅग शुक्रवारी रात्री परत मिळाली. त्यांच्या सामानाची ओळख पटवून नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांच्या हस्ते त्यांना ती सुपूर्द करण्यात आली. तर पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी चिंचोळकर यांचा पोलीस ठाण्यात छोटेखानी सत्कारही केला.
घोडबंदर रोड, मानपाडा येथे राहणारे दयानंद कांबळे हे पत्नी आणि आईसह जांभळी नाका येथे शुक्रवारी रिक्षाने सायंकाळी खरेदीसाठी गेले होते. ते रिक्षातून खाली उतरले त्यावेळी त्यांच्याजवळील एक बॅग रिक्षातच राहिली. त्यानंतर त्याच रिक्षामध्ये चिंतामणी ज्वेलर्स येथून गॅस दुरुस्तीचे काम करणारे चिंचोळकर हे अन्य प्रवासी ज्ञानसाधना कॉलेजजवळील आपल्या घरी जाण्यासाठी बसले. तेंव्हा रिक्षात राहिलेल्या बॅगेबाबत त्यांनी रिक्षा चालकाला विचारणा केली असता, ती त्याची नसल्याचे त्याने सांगितले. चिंचोलकर यांनी रिक्षा तशीच नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यास सांगून बॅगेतील किंमती ऐवजासह ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्याकडे जमा केली. तोपर्यंत बॅगेचे मालक कांबळे हेही बॅग हरविल्याची तक्रार देत नौपाडा पोलीस ठाण्यात आले. अवघ्या काही तासातच त्यांना ३० हजारांची सोनसाखळी आणि मोबाईल असा ४० हजारांचा ऐवज सुखरुप परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
चिंचोळकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल जाधव यांनी त्यांना तात्काळ एक हजारांचे रोख बक्षिस देऊन त्यांचा सत्कार केला. सहायक पोलीस आयुक्त सायगावकर आणि उपायुक्त स्वामी यांनीही त्याचे कौतुक केले. गुरुवारी एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. हीच बातमी वाचून आपल्याला प्रेरणा मिळाल्याने आपण हा ऐवज तातडीने पोलीस ठाण्यात जमा केल्याचे चिंचोळकर यांनी पोलिसांना सांगितले. ज्या रिक्षात ही बॅग राहिली त्याने मात्र आपले यात काहीच श्रेय नसल्याचे सांगत काहीच ओळख न सांगता तिथून निघून गेला.