मासिकपाळीचा सन्मान करा , स्वाती बेडेकर यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 06:53 AM2018-03-08T06:53:26+5:302018-03-08T06:53:26+5:30
मासिक पाळी ही समस्या नाही, तर ती महिलांकडे असलेली सुपर पॉवर आहे. तिचा सन्मान केला पाहिजे. जर स्त्री तिच्या मासिक पाळीचा सन्मान करेल, तरच पुरूषही करू लागेल, असे मत पॅडवुमन स्वाती बेडेकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
ठाणे - मासिक पाळी ही समस्या नाही, तर ती महिलांकडे असलेली सुपर पॉवर आहे. तिचा सन्मान केला पाहिजे. जर स्त्री तिच्या मासिक पाळीचा सन्मान करेल, तरच पुरूषही करू लागेल, असे मत पॅडवुमन स्वाती बेडेकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
अांतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त अत्रे कट्ट्यावर बेडेकर यांनी आपल्या सखी प्रकल्पाचा प्रवास उलगडला. पाळीला गंगोत्रीइतका सन्मान दिला पाहिजे. स्त्रियांचे अस्तित्त्व पाळी पूर्ण करते. त्यामुळे मासिक पाळीविषयी मुलींसोबत मुलांचेही प्रबोधन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरातच्या खेड्यापाड्यातील शाळांमध्ये मुलींची संख्या पटलावर जास्त आणि प्रत्यक्षात उपस्थिती कमी आढळल्यावर त्यामागचे कारण शोधण्यास खेड्यापाड्यात फिरु लागले. तेव्हा मासिक पाळीमुळे मुली शाळेत येत नसल्याचे आढळले. ही समस्या गंभीर असूनही दुर्लक्षित आहे असे जाणवले. त्यातून हे काम, चळवळ सुरू झाल्याचा तपशील त्यांनी सांगितला.
महिलांना पाळीच्या दिवसांतील शरीरस्वच्छतेबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे होते. त्यासाठी पॅड बनवून घेतले. नंतर त्याच स्त्रिया हळूहळू मार्केर्टिंग करण्याइतक्या धीट बनल्या. कधीही शाळेत न गेलेल्या या महिला एमबीए म्हणजेच महिला इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन झाल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आजही सरकारी व्यवस्थेत महिलांची संख्या ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे. महिलांना न्याय देण्यासाठी ते प्रमाण वाढवून तेथे समानता आणण्याची गरज आहे. त्यासाठी महिलांनी परिश्रम करुन स्वत:ला एका उंचीवर नेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.