उपमहाराष्ट्र केसरी वैष्णवी पाटीलला घरचा सन्मान; एक लाखाचा धनादेश देऊन सन्मान
By पंकज पाटील | Published: March 28, 2023 05:59 PM2023-03-28T17:59:43+5:302023-03-28T17:59:50+5:30
यावेळी आपणच विजेती असल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया कौतुकाने भारावलेल्या वैष्णवीने दिली.
अंबरनाथ : राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या अंबरनाथ तालुक्यातील वैष्णवी पाटीलला आज घरचा सन्मान मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष असलेले वैष्णवीचे सख्खे काका सदाशिव पाटील यांनी तिचा सन्मान करत तिला कौतुक म्हणून १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी आपणच विजेती असल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया कौतुकाने भारावलेल्या वैष्णवीने दिली.
राज्यात यंदा पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावात राहणाऱ्या वैष्णवी पाटीलने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्याने इतकी मोठी मजल मारल्याने वैष्णवी पाटीलवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. ग्रामस्थ आणि समाजातून होत असलेल्या सन्मानासोबतच आज वैष्णवीचा तिच्या कुटुंबीयांनी सन्मान केला.
वैष्णवीचे सख्खे काका सदाशिव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यालयात आज वैष्णवी पाटीलचा सन्मान करण्यात आला. सोबतच कौतुक म्हणून वैष्णवीला १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला. तर वैष्णवीला प्रशिक्षण देणारे तिचे प्रशिक्षक आणि कोच यांचाही सदाशिव पाटील यांनी सन्मान केला. तर पुढच्या वेळी वैष्णवी आपल्यासाठी नक्कीच महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन येईल, असा विश्वास तिचे काका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी व्यक्त केला