मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By अजित मांडके | Published: September 26, 2022 09:54 PM2022-09-26T21:54:35+5:302022-09-26T21:55:07+5:30
दुर्गेच्या मंडपातील 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाचे महिला पोलीसांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे : घरातील एक माता सशक्त असेल तर संपूर्ण घर सुरक्षित असते. त्यामुळे महिलांचे आरोग्य हे सशक्त असणे गरजेचे आहे, मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद करीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते टेंभीनाका येथे आयोजित केलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचे उद्घाटन केले. या उद्घाटनप्रसंगी प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त मनीष जोशी, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव, वैदयकीय आरोगय अधिकारी डॉ. राणी शिंदे व आरोगय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २६ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित ’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातील एक उपक्रम म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर दहा दिवस राबविण्यात येणार आहे. टेंभी नाका नवरात्रोत्सवात हजारो महिला देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोगय विभागाच्यावतीने हे शिबिर आयोजित केले आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व महिला भाविकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, यासाठी देवी मंडपात जनजागृती करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या अभियानाचे उद्घाटन महिला पोलीसांच्या हस्ते केले, कारण महिला पोलीस या संपूर्ण समाजाचे रक्षण करीत असून समाजाबरोबर घर सुरक्षित ठेवण्याचे कामही त्या करीत आहे, हे अभियान महिलांसाठी असल्यामुळे उद्घाटन महिला पोलीसांच्या हस्ते केले असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानातील एक उपक्रम म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर २६ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर या काळात आयोजित करण्यात आले आहे. टेंभी नाका नवरात्रोत्सवात हजारो महिला देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानात हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
टेंभी नाका येथील शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत महिलांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्याशिवाय, महिलांची बीएमआय, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण, मॅमोग्राफी, एक्स रे, ईसीजी यासारख्या तपासण्या विनामुल्य केल्या जातील. तसेच, रुग्णाच्या आवश्यकतेनुसार महापालिकेच्या रुग्णालयात संदर्भ सेवा देऊन पुढील उपचार करण्यात येतील. या अभियानांतर्गत १८ वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची आरोग्य तपासणी , प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानासाठी राजीव गांधी रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ तसेच ठाण्यातील मान्यवर स्त्रीरोग रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आपली सेवा देणार आहेत. तसेच महिलांना व बालकांना फोलीक ॲसीड, कॅल्शिअम, आयर्न अशी आवश्यकतेनूसार औषधेही देण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत समुपदेशनही केले जाणार आहेत. त्यात, गर्भधारणापूर्व काळजी आणि मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती, पोषण या विषयांचा समावेश आहे. या अभियानात, सोनोग्राफी शिबीरही घेण्यात येणार आहे. यामध्ये चेस्ट एक्सरे, आवश्यकतेनूसार मॅमोग्राफी करण्यात येणार आहे. तसेच महिला व मातांचे हिमोग्लोबीन, रक्त-लघवी यांच्या तपासण्या करण्यात येणार आहे. माता-बालकांचे लसीकरणही करण्यात येणार आहे. ३० वर्षावरील स्त्रीयांचे कर्करोग, रक्तदाब, मधुमेह स्क्रींनिंग करण्यात येणार आहे.