शास्त्रीय संगीताचा सन्मान करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 07:36 AM2023-01-23T07:36:37+5:302023-01-23T07:36:53+5:30
समस्या, ताणतणाव विसरायला लावण्याची ताकद शस्त्रीय संगीतात आहे. त्यात प्रभाताईंचे योगदान मोलाचे आहे.
ठाणे :
समस्या, ताणतणाव विसरायला लावण्याची ताकद शस्त्रीय संगीतात आहे. त्यात प्रभाताईंचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी देशाच्या सीमा ओलांडून गाण्यासोबत भारतीय संस्कृती, परंपरा पोहोचवली आहे. ही त्यांची तपस्या आहे. सरकार कलाप्रेमी असून शास्त्रीय संगीताच्या कायम पाठीशी उभे राहील. शास्त्रीय संगीतासाठी काही उपक्रम, योजना असल्यास त्या मांडा. त्यांचा त्यांचा सन्मान केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले.
ख्यातनाम गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यंदाचा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. गडकरी रंगायतनमध्ये गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे १४ व्या बासरी उत्सव आयाेजित करण्यात आला हाेता. याप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी काढली. ‘वयाने ज्येष्ठ असलो तरी मनाने तरुण राहिले पाहिजे’ असे बाळासाहेब नेहमी सांगत याचा मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.
बाळासाहेबांच्या कृपेनेच गडकरी रंगायतन झाले. त्यामुळे येथे हाेणाऱ्या कार्यक्रमांतून कलावंतांना दुप्पट, तिप्पट प्रेरणा मिळते. ठाणेकर हा ठाणेकर आहे, तो कधी बदलत नाही. त्यामुळेच ठाण्यात येण्याचा आनंद आगळावेगळा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के, गुरुकुल प्रतिष्ठानचे विवेक सोनार, ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.
श्राेत्यांची दाद अन् प्रेम सर्वात माेठे
श्रोत्यांची दाद आणि प्रेम सर्वात मोठे असते. आजचा पुरस्कार हा माझ्या साधनेला मिळालेली सुरेल दाद आहे. हरीजी आणि माझे जुने संबंध आहेत. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळत असल्याने माझा हा आनंद द्विगुणित झाला आहे.
- डॉ. प्रभा अत्रे,
किराणा घराण्याच्या गायिका