स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेत सेवाकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:27+5:302021-08-17T04:46:27+5:30
ठाणे : जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्या हस्ते ...
ठाणे : जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभात कोरोना काळात अन्नधान्य, साहित्य व चीजवस्तू गरजूंना वाटप करून सहकार्य करणाऱ्या विविध संस्था, व्यक्ती व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
या ध्वजारोहण कार्यक्रमात आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, सभापती श्रेया गायकर, सदस्यांसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोरोना काळात विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना सढळ हस्ते सहकार्य करणाऱ्या संस्थांचा, व्यक्तींचा सन्मान अध्यक्ष पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार आणि सभापतींच्या हस्ते करण्यात आला आहे. येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात रोटरी क्लब मिडटाऊनचे राजेंद्र झेंडे, जिंदाल फाउंडेशनच्या विद्या गोरक्षकर, आनंद सर्जाक फाउंडेशनच्या राजेश मुखर्जी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोनाच्या काळात रोटरी क्लब मिडटाऊनने २०० आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू संच पुरवठा केला होता, जिंदाल फाउंडेशनने एक हजार ७५० कुटुंबांना प्री मिक्स अन्नधान्य वितरण केले. आनंद सर्जाक फाउंडेशनने १०० अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून १०० शास्त्रोक्त परसबागा तयार करणार आहेत. रिलायन्स फाउंडेशनने ६०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू संच कोविड कालावधीत पुरवला, रोटरी क्लब कल्याण रिव्हरसाईड या संस्थेने १०० आदिवासी कुटुंबांना कोविड कालावधीत अन्नधान्य संच पुरवठा केला होता. लायन्स क्लब जुहू या संस्थेने ५० अंगणवाडी स्मार्ट करून दिल्या आहेत. रोटरी क्लब इलेगंट यांनी दोन अंगणवाडी स्मार्ट करून दिल्या आहेत. विविध संस्थांच्या सहकार्याने उपलब्ध अन्नधान्य संच ज्या कुटुंबांमध्ये गरोदर महिला, स्तनदा माता आणि कुपोषित बालके असतील अशा कुटुंबांना दिल्याचा दावा जिल्हा परिषदेने यावेळी केला.
--------फोटो आहे