पोलीस अधिकारी संजू जॉन यांना सन्मानचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:35 AM2021-05-03T04:35:16+5:302021-05-03T04:35:16+5:30
कल्याण : दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांनी पोलीस दलात ...
कल्याण : दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांनी पोलीस दलात केलेल्या गुणवत्ता सेवा आणि उत्कृष्ट कामगिरीबाबत सन्मानचिन्ह या पोलीस दलातील सर्वोच्च पदकाने पोलीस महासंचालकांच्या वतीने सन्मानित केले जाते. यंदाच्या वर्षी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू सीव्ही जॉन, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले आणि पोलीस नाईक प्रकाश पाटील यांची सन्मानचिन्ह पदकासाठी निवड झाली आहे.
कल्याण परिमंडल ३च्या हद्दीत घडणारे खून, दरोडे, वाहनचोरी, घरफोड्या, सोनसाखळी चोरी आदी गुन्ह्यांतील आरोपींचा छडा लावण्यात जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाची विशेष कामगिरी राहिली आहे. जॉन यांच्या पथकातील पोलीस हवालदार भोसले यांचा उत्कृष्ट डिटेक्शन नेटवर्कमध्ये हातखंडा असल्याने त्यांनीही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण - डोंबिवलीतील बरेचसे गंभीर गुन्हे २४ तासांत उघड केले. त्यांच्यासह पोलीस नाईक पाटील यांचीही गुन्हे तपासकामी मोलाची कामगिरी राहिली आहे. या अधिकारी आणि अंमलदारांना जाहीर झालेल्या सन्मानचिन्ह पदक, प्रशस्तिपत्रकाबाबत सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय येणपुरे यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
------------------------------------------------------
संजू जॉन यांचा फोटो