महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

By सुरेश लोखंडे | Published: August 1, 2023 07:58 PM2023-08-01T19:58:57+5:302023-08-01T19:59:08+5:30

बदलत्या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी जनसेवेचे काम अविरत सुरू ठेवावे - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

Honoring the officers and employees of the district who have done excellent work on the occasion of Revenue Day | महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

googlenewsNext

ठाणे :-आजच्या बदलत्या युगात, माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या संकल्पना, माध्यमे बदल आहेत. अशा या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी जनसेवेवर भर देऊन नागरिकांना सेवा देण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवावे, असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले. 

महसूल दिनानिमित्त आजपासून ठाणे जिल्ह्यात आयोजित महसूल सप्ताहाच्या मुख्य कार्यक्रमात शिनगारे बोलत होते. या सप्ताहाच्या शुभारंभ अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाय यांच्या हस्ते झाला.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी  दीपक चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपविभागीय अधिकारी विकास गजरे, विजयानंद शर्मा, जयराज कारभारी, रामदास दौंड, जिल्हा भूमीअभिलेखचे अधिक्षक बाबासाहेब रेडेकर, तहसीलदार अक्षय ढाकणे, अंबरनाथचे तहसीलदार प्रशांती माने, नारायण राजपूत, आदी यावेळी उपस्थित होते. शहापूर येथे आज सकाळी झालेल्या क्रेन कोसळून मृत्यू पडलेल्या कामगारांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिनगारे म्हणाले, की वर्षभरात महसूल विभागातील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांचे, मेहनतीचे कौतुक करण्याचा महसूल दिवस हा एक कार्यक्रम आहे. या वर्षी महसूल दिन हा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. कोणत्याही आपत्ती अथवा शासकीय उपक्रम, कार्यक्रम असो, प्रत्येक ठिकाणी सर्वात आधी महसूल विभाग पोचलेला असतो. कोणत्याही काळात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या या कुटुंबाचा घटक म्हणून मला या विभागाचा अभिमान आहे. असेही ते म्हणाले.

बदलत्या विकासाच्या संकल्पना राबविताना लोकांची सेवा पुरवत महसूल विभागाचे महत्त्व आणखी अधोरेखित करण्याची गरज आहे. नागरिकांना लागणाऱ्या विविध सेवा त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी या सप्ताहात जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवा संवाद कार्यक्रमातून युवकांना लागणाऱ्या दाखले व त्यासाठीचे प्रक्रिया व कागदपत्रांची माहिती देण्यात येणार असून युवकांना महसूल विभागाशी जोडण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे. जनसंवाद कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यात याव्यात. यासाठी मुरबाड सारख्या दुर्गम भागापर्यंत प्रशासनाने पोहचावे. सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सैनिकहो तुमच्या साठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही अनेक कार्यक्रम होणार आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी जायभाय यांनी आतापर्यंत अनुभवलेल्या महसूल विभागाच्या आठवणी सांगून  म्हणाल्या की, महसूल दिन हा आपल्या कामांचे सिंहावलोकन करण्याचा दिवस आहे. महसूल विभाग म्हणून आपण लोकाभिमुख झालो आहोत का याचा विचार प्रत्येकाने करावा. या विभागाला मानवी चेहरा देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. 

निवासी उपजिल्हाधिकारी परदेशी यांनी महसूल सप्ताहात आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, महसूल विभागाचे सर्वस्तरातील कर्मचारी हे नेहमीच कोणत्याही घटनेत, उपक्रमात व विविध योजना राबविण्यात पुढे असतो. महसूलच्या योजना, सेवा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी राबत असतो. ही कामे करत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.  

महसूल दाखल्यांच्या घडीपुस्तिकेचे विमोचन
महसूल सप्ताहानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध सेवा व त्यासंबंधी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती असलेल्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन शिनगारे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. 

तणावमुक्ती व्यवस्थापन व मानसिक आरोग्य विषयक तज्ञांनी केले मार्गदर्शन- 
महसूल दिन कार्यक्रमानिमित्त महसूल कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्ती व्यवस्थापन तसेच मानसिक आरोग्य राखण्यासाठी काय करावे, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ओल्टो संस्थेचे मानसोपचार तज्ञ डॉ. राजीव रंजन, महिमा चौधरी  यांनी रोजच्या जीवनात तणावापासून दूर कसे रहावे, तणाव वाढल्यास काय करावे याविषयी मार्गदर्शन केले. तणावामुळे शरिरावर व मनावर परिणाम होते. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी तणावमुक्तीसाठी स्वतःसाठी रोज थोडातरी वेळ द्यावा,असे त्यांनी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय किर्तीचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आशिष भूमकर यांनी मानसिक आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक मनाला एक शरीर असतो, ही संकल्पना लक्षात ठेवावी. डॉक्टर हे शरीराची काळजी घेतील मात्र, स्वतःच्या मनाची काळजी स्वतःलाच घ्यावी लागेल. आपल्याला कोणता त्रास होते, हे नेमकेपणाने वैद्यकीय तज्ज्ञांना नेमके सांगून त्यावर उपचार करावेत. आपल्याविषयी माहिती असलेले डॉक्टर असावेत जेणेकरून ऐनवेळी मदतीसाठी त्यांच्याकडे जाता येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार-
गेल्या वर्षभरात विविध उपक्रम, योजना राबवून जिल्ह्यातील महसूल, जिल्हा निबंधक, जिल्हा भूमिअभिलेख विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ६७ अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी शिनगारे व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार राहुल सारंग, भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांच्यासह नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी, शिपाई, कोतवाल यांचा सत्कार करण्यात आला. शहापूर दुर्घटनेच्या ठिकाणी तातडीने पोहचून बचाव कार्य सुरू केल्याबद्दल उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार कोमल ठाकूर यांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.

Web Title: Honoring the officers and employees of the district who have done excellent work on the occasion of Revenue Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे