महापालिका परिवहन बस सेवा सुरू होण्याच्या आशा धूसर, मनसेचं निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 06:59 PM2021-02-16T18:59:59+5:302021-02-16T19:00:50+5:30
उल्हासनगरातील नागरिकांसाठी एसटी बस सेवा सुरू करा, मनसेची राज्य परिवहन मंडळाकडे मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका परिवहन बस सेवा सुरू होण्याच्या आशा धूसर झाल्याने, नागरिकांच्या सुखसुविधा साठी एसटी बस सुरू करण्याची मागणी मनसेने राज्य परिवहन महामंडळाकडे केली. एसटी बस सेवा सुरू झाल्यास सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया बंडू देशमुख यांनी दिली. उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर, त्यांनी खाजगी ठेकेदारा मार्फत धुमधडाक्यात महापालिका परिवहन बस सेवा सुरू केली. मात्र अवघ्या साडे तीन वर्षात तिकीट दरवाढीवरून महापालिका व ठेकेदार आमने-सामने उभे ठाकले. तिकीट दरवाढीस मंजूरी दिली नसल्याने, ठेकेदारांने परिवहन बस सेवा बंद केली. त्यामुळे, नागरिकांची गैरसोय होत आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अनेकदा महापालिकेने निविदा काढल्या. मात्र निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर परिवहन बस सेवे विना अस्तित्वात असलेली, परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव येणाऱ्या महासभेत आला. महापालिका परिवहन बस सेवा सुरू होण्याच्या आशा धूसर झाल्यानंतर, मनसेचे अध्यक्ष बंडू देशमुख यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे शहरात पूर्वी प्रमाणे बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. महापालिकेची बस सेवा पुर्णपणे बंद असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे. मंगळवारी शहरात राज्य महामंडळाची बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी कल्याण एसटी डेपोचे आगार व्यवस्थापक विजय गायकवाड व विठ्ठलवाडी डेपोच्या आगार व्यवस्थापक शेळके यांच्याकडे मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली. शहरात बससेवा सुरू झाल्यास एसटी महामंडळाच्या उत्पन्नात सुध्दा वाढ होईल. अशी आशा व्यक्त केली. यावेळी पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष प्रदिप गोडसे, मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार, शालिग्राम सोनवणे, शैलेश पांडव, अँड अनिल जाधव, सुभाष हटकर, मुकेश सेठपलानी, तन्मेश देशमुख, संजय साळवे,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
परिवहन समिती बरखास्तीला विरोध
महापालिका परिवहन बस सेवा ठप्प असतांना, परिवहन समिती बरखास्त करण्याची मागणी विविध संघटनेकडून केली गेली. अखेर महापालिका प्रशासनाकडून परिवहन समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव महासभेत आला. मात्र सत्ताधारीसह विरोधी पक्ष समिती बरखास्त करण्याच्या विरोधात आहेत.