‘फेरीवाल्यांचा भस्मासूर न रोखल्यास भीषण स्थिती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:27 AM2021-09-02T05:27:26+5:302021-09-02T05:27:26+5:30
ठाणे : ठाणे शहरातील काही राजकीय व्यक्ती, माफिया आणि काही महापालिका अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळेच फेरीवाल्यांना वर्षानुवर्षे अभय ...
ठाणे : ठाणे शहरातील काही राजकीय व्यक्ती, माफिया आणि काही महापालिका अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळेच फेरीवाल्यांना वर्षानुवर्षे अभय दिले गेल्याने त्यातून हल्लेखोरीचा भस्मासूर निर्माण झाला. फेरीवाल्यांची गुंडगिरी सुरू झाली. या भस्मासुराला पोसणे बंद केले तरच फेरीवाले आटोक्यात येतील. अन्यथा, आणखी भीषण परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर कासारवडवली येथे सोमवारी फेरीवाल्याने हल्ला केला. पिंपळे यांच्यावरील हल्ल्यातील आरोपीला कठोर शासन मिळण्याबरोबरच भविष्यात कोणताही समाजकंटक वा फेरीवाला महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यास धजावणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे; मात्र सद्यस्थितीत फेरीवाल्यांपुढे प्रशासन हतबल असल्याचे चित्र असल्याचे डुंबरे यांनी सांगितले.
फेरीवाला धोरणाची गरज
ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी रखडली आहे. हॉकर्स झोन निर्माण करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येला व पर्यायाने मुजोरीला तोंड द्यावे लागत आहे. आता फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी व हॉकर्स झोनची निर्मिती यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
...........