कोरोनाची धास्ती: गुढी विनाच साजरा करावा लागला ठाणेकरांना पाडवा
By जितेंद्र कालेकर | Published: March 25, 2020 09:02 PM2020-03-25T21:02:33+5:302020-03-25T21:11:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाण्यात संचारबंदी लागू असल्यामुळे वर्तकनगर, शास्त्रीनगर , लोकमान्यनगर आणि इंदिरानगर भागात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाण्यात संचारबंदी लागू असल्यामुळे वर्तकनगर, शास्त्रीनगर , लोकमान्यनगर आणि इंदिरानगर भागात सकाळी अवघ्या काही वेळासाठीच फूल विक्रेते उपलब्ध होते. त्यामुळे अनेकांना झेंडूची फूले किंवा बत्ताशाही खरेदी करता न आल्याने गुढी विनाच पाडवा अनेक ठाणेकरांना साजरा करावा लागला.
मराठी नविन वर्ष अर्थात गुढीपाडवा या सणाची सुरुवात गुढी उभारुन केली जाते. परंतू, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली संचारबंदीचा फटका फूल, बत्ताशा, लिंबाची पाने तसेच इतर सामुग्री विकणाऱ्यांना बसली. हा मालच उपलब्ध न झाल्यामुळे किरकोळ विक्रेते इंदिरानगर, शास्त्रीनगर किंवा वर्तकनगर येथील मार्केटमध्ये उपलब्ध नव्हते. काही मोजक्या विक्रेत्यांनी अवघा काही काळच ही सामुग्रीची विक्री केली. त्यामुळे अनेक रहिवाशांना नविन वर्षाची सुरुवात ही गेल्या कित्येक वर्षामध्ये गुढी न उभारताच करावी लागली. नविन वर्षात आपल्या वाहनांना आणि यंत्रसामुग्रीचे पूजन करुन फूले वाहण्याची तसेच हार घालण्याचीही प्रथा आहे. मात्र, आपल्या वाहनांसाठी फुलाचा हार उपलब्ध झाला नसल्याची खंत अनेक ठाणेकरांनी व्यक्त केली.
‘‘ घराबाहेर जावे तर संचारबंदी आहे. त्यामुळे ठराविक ठिकाणी चौकशी केली. फुलांची आणि इतर सामुग्रीची उपलब्धता झाली नाही. त्यामुळे आज गुढी न उभारताच गुढीपाडवा साजरा केला.’’
संभाजी चव्हाण, वसंतविहार, ठाणे