रुग्णालयावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; मेहता, हुसेन आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:11 AM2019-06-30T00:11:39+5:302019-06-30T00:12:36+5:30
मेहता यांनी पत्रकार परिषदेत हुसेन हे संचालक असलेल्या उमराव संस्थेच्या रुग्णालयाविरोधात आरोपांची राळ उठवली. पालिका आरक्षणाच्या जागी हे रुग्णालय मंजूर करताना २५ टक्के बांधकाम पालिकेला द्यायचे होते.
मीरा रोड : मेहता यांनी पत्रकार परिषदेत हुसेन हे संचालक असलेल्या उमराव संस्थेच्या रुग्णालयाविरोधात आरोपांची राळ उठवली. पालिका आरक्षणाच्या जागी हे रुग्णालय मंजूर करताना २५ टक्के बांधकाम पालिकेला द्यायचे होते. पण, काँग्रेसच्या काळात ते रद्द करून सरकारने आणखी दोन चटईक्षेत्र मंजूर केले. त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्के खाटा मोफत, २० टक्के खाटा आर्थिकदृष्ट्या गरिबांना मोफत द्यायच्या आहेत. तर, १० टक्के बाह्यरुग्ण सेवा गरिबांसाठी मोफत द्यायची आहे. शिवाय, १० टक्के खाटा पालिका आयुक्तांच्या शिफारशीनुसार माफक दरात उपचार करणे बंधनकारक असल्याचे मेहतांनी म्हटले आहे. परंतु, त्यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासह रुग्णालयाच्या मनमानी कारभारावर आळा घालण्यासाठी १९ जून रोजी आयुक्त बालाजी खतगावकर आदींनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी रुग्णालयातील अटींचे पालन होत असल्याचा नियमित आढावा घेण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले. त्यातच सहायक संचालक हे अध्यक्ष, तर भीमसेन जोशी रुग्णालयाचे अधीक्षक सचिव असतील. पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी असतील. याशिवाय, ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांचा तसेच महापालिकेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी समितीमध्ये असेल, असे मेहता यांनी सांगितले.
आरक्षण असल्याने २५ टक्के बांधकाम पालिकेला द्यायचे होते. पण, उमरावने ते दिले नाही. पण, सेव्हन इलेव्हन कंपनीने मात्र आरक्षणात रुग्णालय बांधताना पालिकेला २५ टक्के बांधकाम करून दिले. उमरावसारख्या सेव्हन इनेव्हन कंपनीने कोणताही एफएसआय घेतला नाही. त्यामुळे आता सेव्हन इलेव्हन रुग्णालयाच्या जागेत शॉपिंग मॉल चालवू, कार्यालय चालवू, याच्याशी काही देणेघेणे राहिलेले नाही, असे मेहतांनी स्पष्ट केले.
मेहतांच्या आरोपांवर हुसेन यांनीही प्रत्यारोप केले आहेत. ज्या मीरा-भार्इंदरच्या नागरिकांनी विधानभवनात पााठवले, त्या मेहतांना कायद्याचे ज्ञान नाही व उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नाही, याचे दु:ख वाटते, असा टोला लगावला. मेहतांनी कायद्याचा अभ्यास करावा, असा सल्ला देत सरकारची दिशाभूल करू नका, असे सुनावले.
मेहता यांच्यावर टीकेची झोड
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांनी मात्र थेट मेहता व त्यांच्या कंपनीविरोधात टीकेची झोड उठवली आहे. महापालिकेला २५ टक्के बांधकाम करून द्यायचे असताना मेहतांनी पालिकेला देय बांधकाम हडप करून ठेवले होते.
जेव्हा सामाजिक संस्थांनी महापालिकेबाहेर उपोषण केले. सरकार, लोकायुक्तांकडे तक्रारी झाल्या, तेव्हा कुठे मेहतांनी पालिकेच्या आणि नागरिकांच्या हक्काची २५ टक्के हडप केलेली जागा पालिकेस दिली, असे त्यांनी सांगितले.
मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून
काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन निवडणूक लढणार, हे जवळपास निश्चित झाल्याने विद्यमान भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर उमराव रुग्णालयावरून आरोप होत आहेत. तर, हुसेन यांनीही आरोपांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. यातून विधानसभा निवडणुकीची धूळवड आतापासूनच सुरू झाली आहे.