केडीएमसीची रुग्णालये सलाइनवर

By admin | Published: June 10, 2017 01:05 AM2017-06-10T01:05:56+5:302017-06-10T01:05:56+5:30

केडीएमसीच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर या दोन मोठ्या रुग्णालयांसाठी डॉक्टरांची ११५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ

Hospital Hospitals on KDMC | केडीएमसीची रुग्णालये सलाइनवर

केडीएमसीची रुग्णालये सलाइनवर

Next

मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर या दोन मोठ्या रुग्णालयांसाठी डॉक्टरांची ११५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ५४ पदे भरली गेली आहे. उर्वरित ६४ पदे रिक्त असून ती विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची आहेत. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होत नाहीत. प्रसंगी त्यांना खाजगी अथवा कळवा, उल्हासनगर आणि मुंबईच्या सरकारी रुग्णालयात पाठवले जाते.
महापालिकेतील रिक्त डॉक्टरांचा मुद्दा २००९ पासून गाजत आहे. डॉक्टरांअभावी रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार होत नाहीत, अशी बाब अनेकदा लोकप्रतिनिधींनी मांडली आहे. पदे मंजूर नसल्याने रुग्णालयातील डॉक्टर भरती प्रलंबित होती. भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी ही पदे भरण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा केला होता. त्यानंतर, सरकारने पदे भरण्यास मंजुरी दिली. महापालिकेने पदे भरण्यासाठी १९ नोव्हेंबर २०१५ ला वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याला मिळालेल्या प्रतिसादानुसार मुलाखतीसाठी ३९ उमेदवार आले. त्यापैकी २२ जणांची महापालिका प्रशासनाने निवड केली. तसेच अपघात व सामान्य प्रवर्गात १९ जणांची निवड केली गेली. फिजिशियनच्या चार जागा केडीएमसीला भरायच्या होत्या. मात्र, केवळ एकाच उमेदवाराचा प्रतिसाद मिळाला होता. मात्र, तो मुलाखतीसाठी आलाच नाही. त्यामुळे फिजिशियनची जागा रिक्त आहे. शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञाची गरज असते. सर्जनसाठी तीन जागा आहेत. मात्र, एकही जागेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एकही सर्जन महापालिकेच्या रुग्णालयात नाही.
महापालिकेच्या मंजूर जागांनुसार सहा भूलतज्ज्ञ भरायचे होते. त्याला चार जणांनी प्रतिसाद दिला. मात्र, दोन जण निवडले गेले. चार पदे अद्याप रिक्त आहेत. या दोन जणांवर दोन्ही रुग्णालयांतील शस्त्रक्रियांचा ताण आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ १० आवश्यक आहेत. त्यापैकी चार जण मुलाखतीला आले. त्यातून दोनच स्त्रीरोगतज्ज्ञ निवडले गेले. अद्याप आठ स्त्रीरोगतज्ज्ञांनी आवश्यकता आहे. त्वचारोगतज्ज्ञांच्या दोन जागा होत्या. त्यासाठी दोन जण आले होते. दोन्ही निवडले गेले. परंतु, एक जण सोडून गेला. बालरोगतज्ज्ञांच्या नऊ जागा होत्या. त्याला तिघांचा प्रतिसाद मिळाला. त्यापैकी दोन जण प्रत्यक्षात कामावर रुजू झाले. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांच्या सात जागा रिक्तच आहेत. पॅथॉलॉजीच्या तीन जागा होत्या. त्यापैकी दोन जण निवडले गेले. एक जण आलाच नाही. त्यामुळे एक जागा रिकामी आहे. नेत्रचिकित्सकाच्या दोन जागा होत्या. दोन जणांची निवड झाली. पण, एक जण सोडून गेला. दंतचिकित्सिकाची एक जागा असून ती रिक्त आहे. याशिवाय, न्यायवैद्यकाच्या दोन जागा होत्या. त्याही रिक्तच आहेत. विशेषज्ञ डॉक्टरांची वानवा असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. सामान्य व अपघात प्रवर्गात ३४ जागा होत्या. त्यापैकी १९ जागा भरलेल्या आहेत. १५ जागा रिक्तच आहेत. डॉक्टर व इतर स्टॉफच्या रिक्त असलेल्या ६४ जागांची पदे भरण्याची प्रक्रिया दीड वर्ष उलटून गेले, तरी अद्याप पुढे सरकलेली नाही.
महापालिकेकडून एका विशेषज्ञ डॉक्टरला किमान ५० हजार रुपये पगार दिला जातो. महापालिकेतील डॉक्टर बाहेर खाजगी सेवा करू शकत नाही. त्याला ही सेवा न करण्यासाठी आठ हजार रुपये भत्ता दिला जातो. काही डॉक्टर हे महापालिकेत काम करून बाहेरही प्रॅक्टीस करू इच्छितात. त्यामुळे ते महापालिकेत टिकत नाहीत. परिणामी, महापालिकेच्या डॉक्टर भरतीच्या प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाही. या कचाट्यात डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची भरती अडकली आहे.

Web Title: Hospital Hospitals on KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.