पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी रुग्णालय, सरनाईकांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 06:14 AM2022-03-09T06:14:04+5:302022-03-09T06:14:35+5:30
आंदोलनाचा इशारा : शिवसेनेला घरचा अहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात शिवसेनेतील अंतर्गत धुसफुस पुन्हा पार्किंग प्लाझा येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याच्या मुद्द्यावरून चव्हाट्यावर आली आहे. या प्रस्तावित हॉस्पिटलला सत्ताधारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोध दर्शविला आहे. या ठिकाणी पार्किंग प्लाझाच ठेवावे, अशी सूचना करून हॉस्पिटल उभारल्यास त्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा घरचा अहेर त्यांनी मंगळवारी सत्ताधारी शिवसेनेला दिला.
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शेठ ग्रुपच्या विकास प्रकल्पात पार्किंग प्लाझा उभारण्यासाठी मान्यता दिली. परंतु, आता तेथे रुग्णालय उभारण्याचा घाट घातला जात असल्याने सरनाईक यांनी आक्षेप घेतला आहे.
हॉस्पिटलसाठी चुकीची इमारत
वास्तविक पाहता पार्किंग प्लाझाची प्रत्येक मजल्याची उंची ही ८ फुटांपेक्षा कमी आहे. या जागेची निर्मिती पार्किंग प्लाझाच्या नियमानुसार केली आहे. हॉस्पिटलसाठी ही जागा नियमानुसार वापरता येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पार्किंग प्लाझाच्या शेजारीच मोठे अद्ययावत हॉस्पिटल आहे. त्यामुळे हा प्रस्ताव चुकीचा असल्याने व कायद्याच्या कक्षेत बसत नसल्याने पालिकेच्या या चुकीच्या प्रस्तावाला नगरविकास विभाग मान्यता देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
घोडबंदरच्या आरक्षित भूखंडावर हॉस्पिटल बांधा
पालिकेला हॉस्पिटल निर्माण करावयाचे असेल तर घोडबंदर येथील आरक्षित भूखंडावर ते बांधून त्याचा मोफत कसा लाभ होईल याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी सुचविले आहे. त्यामुळे या जागेचा हॉस्पिटल म्हणून वापर करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला असेल तर त्याला तीव्र विरोध राहील व त्यासाठी वेळप्रसंगी मला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा दमही त्यांनी भरला आहे.