कोरोनाचा रुग्ण आढळल्यास रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचीही चाचणी करावी : महापौर नरेश म्हस्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:44 PM2020-03-31T17:44:40+5:302020-03-31T17:44:56+5:30
सर्वसाधारण आजारासाठी नागरिक खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी जात असतात, परंतु काही दिवसापूर्वी रुग्णांची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता रुग्णांवर उपचार केले गेले.
ठाणे : सर्दी, खोकला, ताप अशा किरकोळ आजारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडे दुर्लक्ष न करता सध्याच्या कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेवून अशा रुग्णांची संपूर्ण तपासणी करताना त्यांनी परदेश प्रवास केला असल्यास त्याची माहिती घेवून त्यांच्या आजाराचे योग्य निदान होईल या दृष्टीने सर्वच रुग्णालयांनी सतर्क रहावे, तसेच एखाद्या रुग्णांबाबत कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास त्याची माहिती महापालिका प्रशासनास तात्काळ देवून सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील सर्व रुग्णालयांना केले आहे.
सर्वसाधारण आजारासाठी नागरिक खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी जात असतात, परंतु काही दिवसापूर्वी रुग्णांची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता रुग्णांवर उपचार केले गेले. ठाण्यातील एका रुग्णालयात कोरोनाबाधीत रुग्ण दाखल झाला होता, परंतु या रुग्णाची कोणतीही माहिती न घेता त्याच्यावर किरकोळ औषधोपचार करुन सोडण्यात आले. परंतु सदर आजार बरा न झाल्यामुळे त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेतले असता या दरम्यान करण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न् झाले, अशा वेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचारी वर्ग यांची देखील कोरोना चाचणी करणे आवश्यक असून महापालिका प्रशासनास देखील कळविणे गरजेचे आहे. ही बाब ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्र प्रमुख वर्षा ससाणे व राणी शिंदे यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी संबंधित रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करण्यास भाग पाडले असून याबाबतची माहिती ते दररोज सर्व आरोग्य केंद्रप्रमुखांकडून घेत आहेत.
काही रुग्णालयामध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे आढळून येत आहे, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी हे ठाणे शहरातील मध्यमवर्गीय, झोपडपट्टी विभागातील असून त्यांचेपासून परिसरातील नागरिकांना देखील धोका पोहचू शकतो ही गंभीर बाब आहे. तरी सद्यस्थीतील ठाणे शहरातील ज्या व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी ज्या रुग्णालयात उपचार घेतलेले आहेत अशा सर्व रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका व त्यांचे संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करुन घेण्यात यावी असे आदेश देखील महापौर नरेश म्हस्कें यानी सर्व खाजगी रुग्णालयांना दिले आहेत.
तसेच ठाणे शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये यापुढे तपासणी व उपचारार्थ दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची पाशर्वभूमी जाणून घेवून त्यांच्यावर उपचार करावेत, जेणेकरुन कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी निश्चीतच मदत होईल व कोरोनासदृश्य रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती महापालिका प्रशासनास देवून पुढील अनर्थ टाळण्यासाठी दक्ष राहून सहकार्य करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.