खासगी कंपन्यांच्या जागेवर उभारणार रुग्णालये'; महामंडळाचे कोट्यवधी रुपये होणार खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:18 AM2020-08-27T00:18:09+5:302020-08-27T00:18:18+5:30
भूखंड जैसे थे करून द्यावे लागणार
ठाणे : ठाणे महापालिका सिडको, म्हाडासह एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून जी पाच रुग्णालये उभारणार आहे, ती खासगी कंपन्यांच्या जागेवर उभी राहणार आहेत. यामुळे त्यासाठी जागेचे भाडे तर द्यावे लागणारच, शिवाय साथ ओसरल्यानंतर ती पुन्हा तोडून संबंधित कंपन्यांचा भूखंड जैसे थे करून परत द्यावे लागणार आहेत.
या पाचपैकी बुश कंपनीच्या जागेवर महापालिकेच्या माध्यमातून ४५६ बेडच्या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. तर, व्होल्टास कंपनीच्या जागेवर न्यू कोविड हॉस्पिटल सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. ते १,०८५ बेडचे असणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात झाली आहे. ज्युपिटर रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी १,३५० बेडचे तिसरे रुग्णालय उभारण्याची मान्यता शासनस्तरावर असतानाही त्याचे काम सुरू झाले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून ते उभारले जाणार आहे. तर, ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे आणखी ३२० बेडच्या रुग्णालयासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचे काम सिडकोच्या माध्यमातून केले जाणार आहे. याशिवाय, घोडबंदर भागातील बोरिवडे येथेही ३०६ बेडचे रुग्णालय उभारले जाणार असून शासनस्तरावर हे काम असून निविदा प्रक्रिया सुरू झाली असली, तरी त्याआधीच कामाला सुरुवात झाली आहे. हे काम झी मीडिया, एमएमआरडीए आणि सिडकोच्या माध्यमातून केले जाणार आहे. या सर्व ठिकाणी वैद्यकीय, वैद्यकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ४,९३४ असणार असून १,५९० तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध केले जाणार आहेत.
अशी असणार बेडची संख्या : विविध ठिकाणी उभारल्या जाणाºया रुग्णालयांमध्ये ४,३३७ बेड असणार असून त्यातील १९८ आॅक्सिजनविरहित, आॅक्सिजनचे ३,०२४, आयसीयूचे एक हजार, व्हेंटिलेटरचे ९५ आणि कोविड डायलेसिसचे २० बेड असणार आहेत.