रुग्णालयाचे बायोमेडिकल वेस्ट घंटागाडीत; पनवेलमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:43 AM2019-12-09T00:43:25+5:302019-12-09T00:43:43+5:30
सिडको कॉलनीत अनेक ठिकाणी उपयोगात आणलेले वैद्यकीय साहित्य फेकून दिले जाते. हे साहित्य उघड्यावर टाकले जाते.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : सिडको कॉलनीत अनेक ठिकाणी उपयोगात आणलेले वैद्यकीय साहित्य फेकून दिले जाते. हे साहित्य उघड्यावर टाकले जाते. यासंदर्भात यापूर्वी अनेकदा वाद निर्माण झाला आहे. असे असतानाच आता पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट घंटागाडीत टाकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे घंटागाडीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या हलगर्जीपणाबाबत महापालिकेचे आरोग्य विभाग संबंधित रुग्णालयाच्या विरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बायोमेडिकल वेस्टची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्याच्या सूचना आहेत. त्याबाबत वेगळी नियमावलीही आहे. मात्र, यानंतरही अनेकदा बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचे प्रकार घडले आहेत. बायोमेडिकल कचरा आरोग्यास घातक आहे. पनवेल परिसरातील खासगी रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून उचलला जातो. तळोजा येथील क्षेपणभूमीवर या कचºयावर प्रक्रिया केली जाते.
बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकला जाणार नाही, तसे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक खासगी दवाखान्यात निर्माण झालेल्या कचºयाची मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जाते. त्याप्रमाणे त्यांच्याकडे रजिस्टरसुद्धा मेंटेन केले जाते. याकरिता संबंधित कंपनीला हॉस्पिटलकडून पैसे द्यावे लागतात. हा खर्च वाचविण्यासाठी काही खासगी रुग्णालये आपला वैद्यकीय कचरा छुप्या पद्धतीने घंटागाडीत टाकत असल्याचे समोर आले आहे.
पनवेल परिसरात मागे घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कठोर मोहीम सुरू केली आहे. मात्र, पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कचरा आता थेट घंटागाडीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी घंटागाडी कामगारांनीच हा प्रकार उघडकीस आणल्याचे सांगण्यात आले. या कचºयात सलाईनच्या बाटल्या, सिरीन तसेच सुई व इतर वैद्यकीय साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे याविरोधात पनवेल महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ कारवाई करेल का? असा प्रश्न विचारला जात आहे.
घंटागाडीमध्ये उपजिल्हा रुग्णालयातून जर बायोमेडिकल वेस्ट टाकले जात असेल तर त्याची माहिती घेतली जाईल आणि त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
- शैलेश गायकवाड, आरोग्य निरीक्षक, पनवेल महानगरपालिका