भिवंडीत वसतिगृहास भीषण आग; ७४ विद्यार्थ्यांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:51+5:302021-03-31T04:40:51+5:30
भिवंडी : भिवंडी तालुक्यात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतांनाच भिवंडी-नाशिक महामार्गावर असलेल्या सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील मुलामुलींच्या वसतिगृहास भीषण ...
भिवंडी : भिवंडी तालुक्यात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतांनाच भिवंडी-नाशिक महामार्गावर असलेल्या सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील मुलामुलींच्या वसतिगृहास भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या आगीमुळे येथील ७४ विद्यार्थी अडकून पडले होते. सुदैवाने या सर्व विद्यार्थ्यांना अग्निशमन दल व स्थानिकांनी अथक प्रयत्नाने सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटने ती लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत अरहम लॉजिस्टिक कॉम्प्लेक्स या ठिकाणी एका इमारतीमध्ये ईडीयु लाईट या संस्थेचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य केंद्र असून या ठिकाणी सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली . पाहता पाहता ती दुसऱ्या मजल्यावरील वसतिगृहापर्यंत पोहचली. इमारतीत धूर पसरल्याने विद्यार्थ्यांनी टेरेसचा आसरा घेतला. त्यानंतर आलेल्या भिवंडी महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास स्थानिकांच्या मदतीने प्रयत्न केला. या वसतिगृहात सध्या ७४ प्रशिक्षणार्थी असून त्यापैकी ३० मुली आहेत. हे सर्व प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून त्यांना या ठिकाणी कॉल सेंटर एक्झिक्युटिव्ह व डाटा एन्ट्रीचे तीन महिन्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांनी या सर्व प्रशिक्षणार्थींची सुखरूप सुटका स्थानिकांच्या मदतीने केली. परंतु, या आगीत सर्व प्रशिक्षणार्थींचे कपडे व अत्यावश्यक साहित्य पूर्ण जाळून खाक झाले आहे. स्थानिकांनी सुटका केलेल्या सर्वांना नजिकच्या अरहम लॉजेस्टिक कार्यालयात बसविल्यानंतर रात्री त्यांच्या जेवण व राहण्याची व्यवस्था प्रेसिडेन्सी स्कूल या ठिकाणी केली. यासाठी पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनी देखील धाव मदतकार्य राबविले.
===Photopath===
300321\img-20210330-wa0024.jpg
===Caption===
भिवंडीत मुलामुलींच्या वसतीगृहास भीषण आग ; अडकलेल्या ७४ विद्यर्थ्यांची सुटका , सुदैवाने मोठी दुर्घटना टळली