वसतिगृहातील जेवणात अळ्या, कंत्राटदाराला नोटीस, कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:10 AM2017-11-27T06:10:12+5:302017-11-27T06:10:17+5:30
पश्चिमेकडील बिर्ला कॉलेजनजीक सरकारी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहे. येथील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणात अळ्या आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. येथे जेवण पुरविणा-या कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या
कल्याण : शहराच्या पश्चिमेकडील बिर्ला कॉलेजनजीक सरकारी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहे. येथील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणात अळ्या आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. येथे जेवण पुरविणा-या कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. जेवण पुरविणाºया कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या आदिवासी वसतिगृहात राहून ९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण पुरविण्याचे काम भिवंडीच्या जागृती महिला बचत गटाला दिले आहे. शुक्रवारी या विद्यार्थ्यांना पनीरची भाजी दिली होती. त्या भाजीत अळ्या असल्याचे विद्यार्थ्यांनी उघडकीस आणले आहे. तसेच त्या दिवशी मुलांना दिलेल्या केळ्यांना देखील कीड लागल्याचे दिसले. याविषयी प्रथम महिला बचत गटाकडे विद्यार्थ्यांनी विचारायचा प्रयत्न केला असता, त्यांना दमदाटी करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एका विद्यार्थ्याच्या जेवणामागे महिन्याला ३ हजार २०० रुपये सरकारकडून महिला बचत गटाला दिले जातात. विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वसतिगृह प्रशासनाकडून यापूर्वीच महिला बचत गटाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र आता अळ्या आढळून आल्या त्याचे काय, असा सवाल विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. प्रकल्प अधिकारी एल. एफ. सलामे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण गावी आल्याने तेथे जाता आले नाही. पण आम्ही आमच्या दुसºया अधिकाºयाला तेथे पाठविले आहे. दुसºया कंत्राटदाराची व्यवस्था करण्यासही सांगितले असून यापुढे या कंत्राटदाराकडून जेवण घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे उपशहरप्रमुख रवी पाटील यांनी रविवारी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. वसतिगृहाची दुरवस्था झाली असून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. त्यात अळ्या सापडतात, ही गंभीर बाब आहे. वसतिगृहाची देखरेख करणारा अधिकारी कल्याणमध्येच राहतो. मात्र वर्ष झाले तरी तो या वसतिगृहाकडे ढुंकूनही पाहत नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
तक्रारी नेहमीच्याच
या वसतिगृहात राहणारा विद्यार्थी सागर मुठे याने सांगितले की, दीड महिन्यापूर्वीच या कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे. तेव्हापासून त्यांच्या काही ना काही तक्रारी दररोज आहेत.
सुरुवातीला विद्यार्थ्यांना जेवण कमी पडत असे. त्यासंदर्भात बैठकही घेतली होती. दरम्यानच्या काळात, दिवाळीच्या सुट्टीत मुले घरी गेली. विद्यार्थी परतल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल, असे वाटत होते.
परंतु आजही परिस्थिती जैसे थेच आहे. १२ तारखेला यासंदर्भात आम्ही वॉर्डनला निवेदन दिले होते. पण त्यावर कारवाई झाली नाही.
हे आमच्या विरोधातील कारस्थान
जागृती महिला बचत गटाचे व्यवस्थापक सुरेश वाडघरे यांनी सांगितले की, आम्ही १५ आॅक्टोबरला या वसतिगृहाचे कंत्राट घेतले. येथे एक मुलगा जेवायला येतो, तेव्हा सहा-सात जणांची ताटे घेऊन जातो. आपल्यासोबत मित्राचे ताट घेऊन गेल्याने अनधिकृत विद्यार्थ्यालाही जेवण मिळते.
या वसतिगृहात ३० मुले अनधिकृतरीत्या राहतात. सुरुवातीला आम्ही त्यांनाही जेवण देत होतो, परंतु आता ते आम्ही बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आमच्यावर राग आहे. आम्हाला येथून हटविण्यासाठी हे कारस्थान केले जात आहे.
आम्ही जेवणात अळ्या का टाकू? डॉक्टरांनी तेल बदलण्यासाठी सांगितले त्या वेळी आम्ही ते लगेचच बदलले. विद्यार्थी खोटे सांगत आहेत. विद्यार्थ्यांना नाश्त्यामध्ये शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी, फळे आणि दूध दिले जाते. तसेच जेवणातही ५ चपात्या, पोटभर भात, दोन भाज्या, लोणचे यांचा समावेश असतो.