ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 12 वीपर्यंतच्या वर्गांचे वसतीगृह - आश्रमशाळा सोमवारपासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:46 PM2021-03-18T22:46:59+5:302021-03-18T22:47:51+5:30
वाढत्या रुग्ण संख्येवरील उपाययोजने अंतर्गत त्यांच्या अखत्यारीतील आश्रमशाळा, वसतीगृह पुढील आदेश होईपर्यंत सोमवारपासून बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे.
ठाणे - जिल्हयातील संपूर्ण ग्रामीण भागासह शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५ वी ते १२ वीचे वर्गांसाठी केवळ आदिवासी विकास विभागाची सर्व वसतिगृहे व निवासी आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाचे अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व निवासी शाळा २२ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री तडकाफडकी जारी केले आहेत
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या दोन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येवरील उपाययोजने अंतर्गत त्यांच्या अखत्यारीतील आश्रमशाळा, वसतीगृह पुढील आदेश होईपर्यंत सोमवारपासून बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे. या आदेशासह जिल्हाधिकाऱ्यांनी इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहणे ऐच्छिक केले आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू ठेवण्याचे त्यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगर परिषद कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी तात्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याची तंबीही त्यांनी संबंधीत प्रशासनाला दिली आहे. याबाबतचे सर्व समन्वयन व संनियंत्रणासाठी आदिवासी विकास विभागासह समाजकल्याण, नगर पंचायत व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जबाबदार धरण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम व भारतीय दंड संहिता नुसार दंडनीय, कारयदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.