कोरोना बाधीत रुग्णांकडून हॉटेलचालकांची लुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 01:15 PM2020-05-12T13:15:40+5:302020-05-12T13:16:23+5:30
कोरोनाची अधिकची लक्षणे नसणाºया रुग्णांवर आता शहरातील दोन तारांकीत हॉटेलमध्ये उपाचार पालिकेच्या माध्यमातून सुरु झाले आहेत. परंतु या हॉटेलचा दिवसाचा खर्च भरतांना कोरोना बाधीत रुग्णाला घाम फुटण्याची वेळ आली आहे.
ठाणे : कोरोना बाधीत रुग्णांसाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध खाजगी रुग्णालये आरक्षित ठेवण्यात आली आहेत. परंतु आता कोरोनाची लक्षणे दिसत नसतांनाही ज्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला असेल त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दोन हॉटेलची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु येथील दिवसाचेच भाडे अव्वाच्या सव्वा असल्याने कोरोना बाधीत रुग्ण हैराण झाले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला ७५० हून अधिक कोरोनाचे रुग्ण उपाचारासांठी विविध रुग्णालयात दाखल आहेत. परंतु दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे, त्यात ज्या रुग्णांना कोरोनाचा जास्त त्रास होत नसेल आणि ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळत नसतील अशा रुग्णांवर आता शहरातील दोन हॉटेलमध्ये उपचार सुरु झाले आहेत. त्या अनुषगांने या दोनही हॉटेलमध्ये जवळ जवळ ५० ते ५५ रुम आरक्षित करण्यात आले आहेत. तर येथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर प्रत्येकी तीन डॉक्टरांची काम करीत आहे. त्यानुसार आजच्या घडीला येथे, ३० च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु आता या रुग्णांना दिवसाचे भाडे देतांनाच तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोनामुळे आधीच उपासमारीची वेळ आली असतांना, त्यातही रोजगाराची श्वास्वती नाही. अशातच आता रुग्णालयाव्यतिरीक्त हॉटेलमध्ये उपचार सुरु झाल्याने त्याचे भाडे भरतांना कोरोना बाधीत रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी एक दाम्पत्याला पालिकेने येथे उपचारासाठी पाठविले होते. परंतु, हॉटेलचे एका दिवसाचे भाडे ऐकूणच त्या रुग्णाला भर उन्हात घाम फुटला होता. दिवसाला ६ हजार भरावे लागतील असे हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले. एकाचे ६ हजार दोघांचे दिवसाचे १२ हजार आणि १४ दिवस उपचारासाठी दाखल व्हावे लागले तर हा खर्च जवळ जवळ दोन लाखांच्या घरात जाणार होता. त्यामुळे त्याने तेथे दाखल होण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने पालिकेकडून अॅब्युलेन्स मागवून रुग्णालयात हलविण्यात यावे अशी मागणी केली. परंतु दुपारी ४ वाजल्यापासून ते दोघे अॅम्ब्युलेन्सची वाट पाहत होते. रात्री ११.३० च्या सुमारास अॅब्युलेन्स आली. त्यामुळे हा मनस्तापही या रुग्णांना सहन करावा लागत आहे.त्यातही पालिकेकडे केवळ ४ च्या आसपास अॅब्युलेन्स असल्याने त्या कुठे कुठे पाठवायच्या असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये आता या हॉटेल चालकांनीही लुट सुरु केल्याचेच दिसत आहे.