हॉटेल मालकच बनला स्टाफ आणि ट्रक चालकांसाठी देवदुत, जवळ जवळ २०० जणांची करतोय तीन वेळा जेवणाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 07:08 PM2020-04-09T19:08:39+5:302020-04-09T19:10:26+5:30
कोरोनाची झळ अनेक व्यावसाय, उद्योगधंद्यांना लागली आहे, असे असतांनाही ठाणे जिल्ह्यातील एका हॉटेल मालकाने आपल्या स्टाफची सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यांचे खाणे, पिणे, आरोग्य याकडे त्याने बारकाईने लक्ष दिले आहे
अजित मांडके, विशाल हळदे
ठाणे : कोरोना या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारचे प्रयतन केले जात आहेत. तिकडे लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळे आली आहे. अनेक उद्योग, धंदे, दुकाने, हॉटेल बंद झाली आहेत. परंतु अशातच एक हॉटेल चालक आपल्या ७० जणांच्या स्टाफसाठी देवदूत झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्वांना सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण तो पुरवित आहे, याशिवाय त्यांच्या राहण्याची आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणीसुध्दा तो करीत आहे. त्यातही कोणीही काम करीत नसतांना त्यांचा पगारही त्याने दिला असल्याची भावना येथील स्टाफ व्यक्त करीत आहे. यापुढेही जाऊन रस्त्यावर लागलेले ट्रक, दुधाचे ट्रक, भाजीपाला घेऊन जाणारे ट्रक अशी रोजची १०० जणांसाठी देखील जेवणाची मोफत व्यवस्था त्याने केली आहे.
भिवंडी जवळील माणकोली नाक्यावर विनोद पाटील आणि जोगी पाटील यांचे हे हॉटेल आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. त्यानंतर सर्वच यंत्रणा बंद झाल्या. त्यात हे हॉटेल देखील बंद झाले. या हॉटेलमध्ये जवळ जवळ १४० लोकांचा स्टाफ कामाला होता. परंतु लॉकडाऊन झाल्याने यातील अर्ध्या लोकांना घरवापसी केली. त्यांना देखील या देवदूताने पूर्ण पगार दिला. परंतु अर्ध्यांनी आम्ही कुठेही जाणार नसल्याचे मालकाला स्पष्ट केले. एखादा मालक असता तर त्याने इथे धंदा नाही तर तुम्हाला कुठुन मी पोसणार असा विचार करुन त्यांनाही हकलून दिले असते. परंतु विनोद आणि जोगी यांनी या ७० जणांची सुविधा हॉटेलमध्ये उपलब्ध करुन दिली. त्यांना राहण्यासाठी रुम्स दिल्या असून त्यांना सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण अशी संपूर्ण व्यवस्था त्याने केली आहे. तसेच सोशल डिस्टेसींगचे पालनही करण्याच्या सुचना त्यांनी सर्वांना दिल्या आहेत. त्यानुसार त्याचेही पालन या स्टाफ कडून केले जात आहे. याशिवाय त्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली जात आहे. त्यातही काम सुरु नसतांनाही शासनाच्या आदेशानुसार या सर्वांना त्यांचा पगारही देण्याची हमी त्यांनी दिली आहे.
दरम्यान केवळ हॉटेलमधील स्टाफच नाही तर या देवदुतांनी रस्त्यावर लांब पल्याला जाणारे ट्रकही लागलेले आहेत. त्यांना तर कसलीच सुविधा नाही. त्यांना देखील दुपार आणि रात्रीचे जेवण देण्याचे कार्य या मंडळींकडून सुरु आहे. तसेच दूरवरुन येणारे दुधाच्या गाड्या, भाजीपाल्याच्या गाडीवरील कामगारांनाही जेवणाची सुविधा त्यांच्याकडून केली जात आहे.
आमच्याकडे १४० जणांचा स्टाफ होता, त्यातील अर्धा स्टाफ हा निघून गेला. त्यांना पगार दिला गेला. मात्र ७० जणांच्या तीन वेळच्या जेवणाची व्यवस्था आम्ही केली आहे. त्यांचे कोणतेही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची काळजी मी घेतली आहे.
(विनोद पाटील - हॉटेल ओनर)
मालकांनी आमची येथे चांगली सोय करुन अगदी आपल्या मुलासांरखा आमचा सांभाळ ते करीत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही.
(जासीम मंडल - मॅनेजर)
मालकाकडून जेवणाचे सर्व साहित्य दिले जात आहे, त्यानुसार आम्ही सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण बनवत आहोत, आमची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे.
(रमेश गायकवाड - आचारी)
- मी येथे कुक म्हणूनच कामाला आहे, परंतु लॉकडाऊन झाल्यानंतर मालकाने आमची येथे चांगली सोय केली आहे. आम्ही आता जेवण बनवतो, शिवाय सोशल डिस्टेसींगचे पालनही करीत आहोत.
(श्रीकांत - आचारी)