तब्बल ४० गुन्हे दाखल असलेल्या अट्टल घरफोड्यास नालासोपाऱ्यातून २३ लाखांच्या मुद्देमालासह अटक
By धीरज परब | Published: March 30, 2023 03:23 PM2023-03-30T15:23:58+5:302023-03-30T15:25:51+5:30
यंदा मात्र देव दर्शना आधीच पोलिसांनी त्याला कोठडीचे दर्शन घडवले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - तब्बल ४० गुन्हे दाखल असलेल्या सराईत घरफोड्यास काशीमीरा पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्यात १० तासात अटक करून चोरलेला २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली . गुन्ह्यात मोठे घबाड लागल्यावर तो दर्शनासाठी अजमेर येथे जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली . यंदा मात्र देव दर्शना आधीच पोलिसांनी त्याला कोठडीचे दर्शन घडवले.
मीरारोडच्या दहिसर चेक नाका येथील डीबी ओझॉन मध्ये राहणारे अकबर अली मोहम्मद अली चुडीहार हे रमजान निमित्त चंद्र दर्शना साठी २३ मार्च रोजी गोरेगाव येथे गेले होते . २६ रोजी सायंकाळी ते घरी परतले असता खिडकीच्या ग्रिलचे लोखंडी गज कापून चोरट्याने घरातील १४ लाख ६५ हजारांचे २९३ ग्रॅम सोन्याचे दागिने , १ किलो वजनाचे ७० हजारांचे सोन्याचे दागिने व ९ लाख रोख असा एकूण २४ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला होता .
काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम , गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे , उपनिरीक्षक जावेद मुल्ला , प्रकाश कावरे , सागर साबळे , अर्चना जाधव सह अनिल पवार, सचिन हुले, निलेश शिंदे, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, संतोष तायडे, रविंद्र कांबळे, शरद नलावडे, प्रविण टोबरे, जयप्रकाश जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला . चोराने चोरी करताना तांत्रिक तसेच भौतिक पुरावा मागे सोडला नव्हता . त्यामुळे गांगुर्डे यांनी अश्या पद्धतीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती तसेच बातमीदारां मार्फत माहिती घेण्यास सुरवात केली . खिडक्यांचे गज कापून घरफोडी करणारा अब्दुल शेख ऊर्फ अब्दुल चिरा (४६) रा . आदर्श निवास, अलकापुरी, नालासोपारा ह्याने गुन्हा केल्याची माहिती मिळाली .
पोलिसांनी नालासोपारा रेल्वे स्थानक भागातून त्याला अटक केली. शेख हा मूळचा दिल्लीचा राहणारा आहे . मुद्देमालासह पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने त्याला पकडले . वेळीच तो हाती लागल्याने त्याने चोरी केलेल्या पैकी २३ लाख १६ हजारांचे दागिने , रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले . शेख हा अट्टल घरफोड्या असून त्याच्यावर मुंबई, ठाणे, पालघर, अजमेर - राजस्थान आदी भागात घरफोडी केल्याचे ४० गुन्हे दाखल आहेत . पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, , अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपास करून प्रशांत गांगुर्डे आणि पोलीस पथकाने आरोपी व मुद्देमाल हस्तगत केल्याचे उपायुक्त जयंत बजबळे पत्रकार परिषदेत म्हणाले .
ठाणे न्यायालयाने शेख ह्याला ३१ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत . अकबर अली यांच्या घरी केलेल्या घरफोडीत मोठा ऐवज हाती लागल्याने शेख हा राजस्थानच्या अजमेर येथे पळून जाण्याच्या तयारीत होता . गुन्ह्यात मोठे घबाड लागल्यावर तो दर्शनासाठी अजमेर येथे जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"