पालकमंत्र्यांच्या घरात, तर आयुक्तांच्या दारात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 12:48 AM2019-06-12T00:48:00+5:302019-06-12T00:48:24+5:30
सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते.
ठाणे : ठाण्यात मान्सूपूर्व पहिल्याच पावसाने पालिकेच्या कामांची पोलखोल केली. सोमवारी अवघा एक तास पडलेल्या पावसामुळे पालकमंत्र्यांच्या निवास्थानाच्या तळघरात पाणी शिरले होते, तर आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरही पाणीच पाणी झाले होते. शहराच्या इतर भागातही ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने नाल्यातील कचरा बाहेर फेकला गेल्याचे आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूककोंडीचाही सामना करावा लागला.
सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. रात्री ९ च्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. फक्त एक तास पाऊस झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. शहरातील जे सखल भाग आहेत, त्या ठिकाणी पाणी साचलेच, मात्र याचा विशेष फटका पालिका आयुक्तांचा बंगला आणि पालकमंत्र्यांनादेखील बसला. हिरानंदानी इस्टेस्टकडे जाणाऱ्या पातलीपाडा येथे जाणाºया रस्त्यावर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा बंगला आहे. त्याच्या समोरच्या रस्त्यावरच मोठ्याप्रमाणात पाणी साचले. त्यातही पातलीपाडा येथील सेवा रस्त्याचे काम केले असले तरी त्याचा स्लोप हा पुढे हिरानंदानी इस्टेटकडे जाणाºया रस्त्याला दिल्याने आणि सेवा रस्ता आणि मुख्य रस्त्याच्यामध्ये असलेल्या फुटपाथखालील गटाराचे तोंड बंद असल्याने, तसेच काही ठिकाणी मुख्य व सेवा रस्ताच एक झाल्याने पावसाचे पाणी आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर जमा झालेहोते. दुसरीकडे मान्सूनपूर्व कामांवर जातीने लक्ष देणाºया पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नितिन कंपनी येथील बंगल्याच्या बेसमेंटमध्येदेखील पाणी शिरल्याने ते बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत जेटिंगची मशिन आणि पंप लावले होते.
अनेक घरांत शिरले पाणी : एरव्ही मोठा पाऊस झाला की शहरातील सखल भागातही पाणी प्रत्येक वर्षी साचत असले तरी सोमवारी एका तासाच्या पावसानेच सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले. यामध्ये वंदना सिनेमा, लोकमान्यनगर, शिवाईनगर, वर्तकनगर भागात नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावर पाणी साचले होते. रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पडझडदेखील झाली असून सिद्धार्थनगर येथे भिंत कोसळल्याची घटना घडली. तर कॅडबरीच्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ या ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. विशेष म्हणजे या पावसाने घोडबंदर येथील आर मॉल येथे हायवेवर पाणी साचले होते.
वीजपुरवठा झाला खंडित : सोमवारच्या एका तासाच्या पावसामुळे नागरिकांना केवळ नालेसफाईचा फटका बसला नसून अनेक ठिकाणी या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. बाजार पेठ, घोडबंदर रोड, मल्हार सिनेमा परिसर, कळवा, खारेगाव आणि ठाण्यातील काही भागात रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी सकाळीदेखील शहरातील काही भागात वीज गुल होती. पावसाळ्यापूर्वी विजेच्या वाहिन्या टाकण्याची कामे पूर्ण करून त्यानंतर या कामासाठी खड्डा खोदू नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. तर काही कामांना मुदतवाढदेखील दिली होती. त्यामुळेच कदाचित ठाणेकरांना याचा फटका बसला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सर्वत्र दाणादाण
च्पहिल्याच पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी दाणादाण उडाली. पावसामुळे बदलापूरमध्ये तब्बल ८ तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. मुरबाड आणि शेणवा येथे काही घरांवरील पत्रे वादळीवाºयाने उडून गेले. याशिवाय काही घरांवरील कौलांचे नुकसान झाले.
च्कल्याणमध्ये ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याने गटारे तुंबली. पालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे केली होती. परंतू नाल्यांमधून काढलेला कचरा तिथेच टाकल्याने तो पावसासोबत पुन्हा नाल्यांमध्ये वाहून गेला. त्यामुळे नाले तुंबले. याशिवाय कल्याणमध्ये काही भागात घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या.