धाेबीघाट येथील डोंगरावरील घरांना तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:24 AM2021-07-22T04:24:57+5:302021-07-22T04:24:57+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं. १ मधील धोबीघाट येथील डोंगर उतारावरील काही घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने ...
उल्हासनगर : कॅम्प नं. १ मधील धोबीघाट येथील डोंगर उतारावरील काही घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने येथील १२ पेक्षा जास्त रहिवाशांना नोटिसा देऊन घरे रिकामी करण्यास बजाविले आहे. या प्रकाराने जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण असून, मनसेने नागरिकांसाठी पर्यायी जागेची मागणी केली आहे.
सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी १२ पेक्षा जास्त घरांना नोटिसा बजावल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे; मात्र बाहेर धाे-धाे काेसळणाऱ्या पावसात आम्ही जायचे कुठे? असा सवाल नाेटीस मिळालेल्या रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांना केला आहे. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी डोंगरावरील घरांची पाहणी करून तडे गेलेल्या घरांतील नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी महापालिकेकडे केली. बंद असलेल्या महापालिका शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणे त्यांनी उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना सुचविली आहेत.
शहरातील धोकादायक इमारतींतील आणि पुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था महापालिका निर्माण करीत आहे; मात्र दुसरीकडे डोंगरउतारावरील तडे गेलेल्या घरातील नागरिकांबाबत महापालिकेचा दुजाभाव का? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला. गेल्या वर्षी डोंगरकड्यावरील माती खचल्याने काही घरांचे नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका मुंबई, ठाणे यांसारख्या घटनांची पालिका वाट पाहत आहे का? असा प्रश्नही रहिवाशांनी व्यक्त केला. महापालिका महापौर लीलाबाई अशान यांच्यासह अधिकाऱ्यांनी तडा गेलेल्या घराकडे पाठ फिरविल्याची टीका मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी केली.