घरकाम, विहिरीतून पाणी काढणे आणि चुकल्यास शिवीगाळ, असे होते राहुलचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 11:43 AM2022-09-22T11:43:02+5:302022-09-22T11:43:48+5:30
वेठबिगारीच्या काळात राहुलचे हाल : शाळाही कायमची सुटली
नितीन पंडित
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : मेंढ्या चरायला न्यायच्या या बोलीवर मला सोबत इगतपुरीला नेणाऱ्या भिवा गोयकर याने घरकामाला जुंपले होते. विहिरीतून पाणी काढावे लागायचे. पडेल ते काम करून मेंढ्या राखायचो. एके दिवशी मेंढ्या रस्त्यावर पळाल्याने गोयकर याने शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली, अशी आपबिती राहुल या अल्पवयीन वेठबिगार मुलाने दिली. दुसरा मुलगा अरुण याचीही कहाणी वेगळी नाही. त्याला वेठबिगारीला जुंपणाऱ्या संभाजी खताळ याची मुले इंग्रजी शाळेत शिकत होती आणि अरुणची शाळा वेठबिगारीमुळे सुटली ती सुटलीच.
श्रमजीवी संघटनेने वेठबिगार म्हणून राबणाऱ्या मुलांचा शोध घेऊन भिवंडी तालुक्यातील राहुल व अरुण या दोन मुलांना अहमदनगर जिल्ह्यातून घरी परत आणून वेठबिगारीतून मुक्त केले. राहुल दिलीप पवार (वय १७) व अरुण रामू वाघे (१२) अशी त्यांची नावे आहेत. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना मुंबईनजीकच्या ठाणे जिल्ह्यात वेठबिगारी सुरू असून, मुले शिक्षणापासून वंचित ठेवली जात आहेत, हे भीषण वास्तव उघड झाले.
पडघा वडवली येथील खोताचा पाडा येथील दिलीप पवार यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील भिवा गोयकर हा आपल्याला मेंढ्या राखण्यासाठी कामगाराची गरज असल्याचे सांगत मागील दीड वर्षापूर्वी आला. त्यांचा मुलगा राहुल याला मेंढ्या राखण्यासाठी घेऊन गेला. घरची परिस्थिती बेताची असल्याने राहुलला दुसरीत आपले शिक्षण सोडून मजुरी करावी लागत होती. मेंढपाळाने महिना पाचशे रुपये देणार व राहुलचे लग्न करणार, असे आश्वासन दिल्याने आजारी वडिलांनी त्याला मेंढपाळासोबत पाठवले. मात्र १५०० रुपये दिल्यानंतर त्याने पवारांकडे पाठ फिरवली.
घरात पैशांची चणचण, वडिलांचे आजारपण आणि संसाराचा गाडा हाकताना आईची होत असलेली फरफट पाहवत नसल्याने मेंढपाळाबरोबर मेंढ्या चारायच्या कामाला गेलो. मात्र, तिथे सर्वच कामे करायला लावली. शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली म्हणून घरी परतलो. आता शेतात मजुरीचे काम करतो व आई- वडिलांना मदत करतो.
- राहुल पवार, वेठबिगारमुक्त तरुण
राहुलला मेंढ्या राखण्याबरोबरच घरकामाला जुंपले. घरातील बारीकसारीक कामे, विहिरीतून पाणी भरणे अशी अनेक श्रमाची कामे राहुलने कोवळ्या वयात केली.
एके दिवशी शेतातून धावणाऱ्या मेंढ्या रस्त्यावर आल्याने गोयकरने राहुलला शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर राहुलने घरी सोडण्याची विनंती केली. मेंढपाळाने त्याला वर्षभर कामाचा मोबदला दिला नाही. अखेर श्रमजीवीने त्याची सुटका केली.
राहुलला मेंढपाळ घेऊन गेला तेव्हा मी खूप आजारी होतो. पायाला सूज आलेली. जगेन की मरेन हे देखील माहित नव्हते. पोराला महिन्याला पैसे मिळणार व त्याचे लग्न होणार, या आशेने मी मुलाला पाठवले. ती माझी चूक होती.
- दिलीप पवार, राहुलचे वडील
पैशांवरून पाटलाशी भांडण झाल्याने मी त्यांच्याकडे कामाला न जाता मिळेल तिथे मजुरी करते. दिवसभर मजुरी करून कधी दीडशे तर कधी दोनशे रुपये रोज मिळतो. पतीची तब्बेत बरी नसल्याने कुटुंबाची खूप ओढाताण होते. त्यामुळे मुलाला बाहेर पाठवले होते.
- संगीता दिलीप पवार, राहुलची आई
मला शिक्षणाची आवड आहे, मात्र परिस्थिती खराब असल्याने मेंढ्या राखण्याकरिता गेलो. मोठा होऊन मी पोलीस होणार आहे.
- अरुण वाघे, वेठबिगारमुक्त तरुण
उन्हाळ्यात वीटभट्टी तर पावसाळ्यात शेतावर मजुरीचे काम करते. मला दिवसाला ३०० रुपये मजुरी मिळते. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळेच आम्ही अरुणला मेंढपाळाकडे पाठवले होते.
- सीता रामा वाघे, अरुणची आई
पडघा वाफाळे येथील सागपाडा येथील रामू वाघे यांच्या गावात मागील वर्षी मेंढ्या घेऊन आलेले मेंढपाळ संभाजी खताळ याने आपली पत्नी आजारी असल्याने मेंढ्या राखण्यासाठी अरुणला महिना ५०० रुपये देण्याचा वादा करून आपल्या सोबत नेले. दीड वर्षे अरुण हा खताळ यांच्याकडे काम करीत होता. खताळच्या चार मुलांपैकी तीन मुले इंग्रजी माध्यमात शिकत होती. अरुण आपले चौथीपर्यंतचे शिक्षण सोडून मेंढ्या राखत होता. दोन लहान मुलांना वेठबिगारी करायला लावल्याने गुन्हा दाखल केला.