महामार्गाच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:04+5:302021-06-16T04:53:04+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे मेंगाळ पाडा व बिरवाडी ...
भातसानगर : शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे मेंगाळ पाडा व बिरवाडी येथील अनेक घरांना मोठमोठे तडे गेले आहेत. अनेक बोअरवेलचे पाणीही गायब झाले आहे, तर काही बोअरवेलच्या मोटरी या जमिनीत अडकून पडल्या आहेत. याबाबत चौकशी करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी, असे निवेदन साेमवारी उपसरपंच प्रकाश भेरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सासे, सदस्य भारती हिरवे, निवृत्ती मेंगाळ, विवेक भेरे, अशोक चौधरी व ग्रामस्थ यांनी तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांना दिले.
तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. मात्र, यासाठी माेठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करण्यात येत आहे. त्यामुळे या महामार्गालगत असणाऱ्या मेंगळपाडा, बिरवाडी या गावांतील अनेक घरांसह पाेल्ट्रींना माेठमाेठे तडे गेले आहेत. तसेच बाेअरवेलचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे पाणी कमी हाेऊन काहींच्या मोटरी जमिनीतच अडकून पडल्या आहेत. यासंदर्भात येथे काम करणाऱ्या कंपनीशी अनेकवेळा संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदाेलनाचा इशारा
चौकशी करून नुकसानभरपाई देण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बिरवाडी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच बाळू वेहळे यांनीही नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.