गृहनिर्माणमंत्र्यांचा दिलासा; तरीही पोलिसांवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:01 AM2020-10-05T00:01:58+5:302020-10-05T00:02:41+5:30
वर्तकनगर पोलिसांनी मात्र निवासस्थाने रिक्त करण्याबाबत पुनरुच्चार केल्याने येथील ४० कुटुंबीय प्रचंड तणावात आहेत.
ठाणे : तांत्रिकदृष्ट्या अतिधोकादायकमध्ये गणल्या गेलेल्या वर्तकनगर येथील १४ आणि १६ या दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे महापालिकेनेही कारवाई न करण्याबाबतचा दिलासा दिला आहे. तरीही, वर्तकनगर पोलिसांनी मात्र निवासस्थाने रिक्त करण्याबाबत पुनरुच्चार केल्याने येथील ४० कुटुंबीय प्रचंड तणावात आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीने म्हाडा वसाहतीमधील पोलीस निवासस्थाने असलेल्या या दोन इमारतींना धोकादायक इमारतीचे तांत्रिक परीक्षण अहवाल (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) तसेच स्थैर्यता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) सादर करण्याची नोटीस चार महिन्यांपूर्वी बजावली होती. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत सी-२ बी (अर्थात रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे) या प्रवर्गात समाविष्ट केली. दरम्यान, ठामपाच्या पॅनलवरील एका वास्तुविशारदाकडून तांत्रिक परीक्षणही येथील रहिवाशांनी केले. मात्र, कोरोनामुळे दुरुस्तीची कामे अर्धवट राहिल्यामुळे स्थैर्यता प्रमाणपत्र मिळालेच नाही. त्यामुळे एक महिन्यापूर्वी दुसऱ्या वास्तुविशारदाकडून पदरमोड करून रहिवाशांनी तांत्रिक परीक्षणही केले. दुरुस्तीही सुरू झाली. तोपर्यंत भिवंडीची दुर्घटना झाल्याने महापालिकेने (दुरुस्ती करून राहण्यायोग्य असलेल्या) इमारतीला अतिधोकादायकचा फलक लावला. तसे पत्रही पोलीस प्रशासनाला दिले. त्याचआधारे वर्तकनगर पोलिसांनी ही घरे तातडीने रिक्त करण्याच्या नोटिसा बजावल्या. हीच कैफियत पोलीस कुटुंबीयांनी मांडल्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी यात मध्यस्थी केली. स्थैर्यता प्रमाणपत्र आणि किरकोळ दुरुस्ती करण्याच्या अटीवर कारवाई न करण्याचे ठामपाच्या सहायक आयुक्त पंडित यांनी मान्यही केले. तरीही, शनिवारी पुन्हा येथील पोलीस कुटुंबीयांना वर्तकनगर पोलिसांकडून घरे रिक्त करण्याचे फर्मान आल्याने घरांचे स्थलांतर कसे करायचे, या तणावातच येथील कुटुंबीय आहेत. रविवारी पुन्हा या कुटुंबीयांनी आपली कैफियत मांडल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी चर्चेअंती घरे रिक्त करण्याच्या कारवाईला स्थगिती मिळविण्यात येईल, असे आश्वासन आव्हाड यांनी या कुटुंबीयांना दिले.
या कारणांसाठी रहिवाशांचा नकार
इमारतीमध्ये एका अधिकाºयासह आठ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. ठाण्यात ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना देऊ केलेली सिद्धी हॉल येथील पर्यायी वसाहतीची अवस्था या इमारतींपेक्षाही बिकट आहे. निवृत्त तसेच मृत पावलेल्या कुटुंबीयांचा कोणताही विचार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इमारत अतिधोकादायक नसून ती दुरुस्त करून राहण्यायोग्य असल्यामुळेच घरे रिक्त करण्याला रहिवाशांचा नकार आहे.