गृहनिर्माण मंत्र्यांचा ठाण्यातील ‘त्या’ ४० पोलीस कुटूंबीयांना दिलासा; तरीही टांगती तलवार

By जितेंद्र कालेकर | Published: October 4, 2020 10:55 PM2020-10-04T22:55:33+5:302020-10-05T00:51:22+5:30

वर्तकनगर येथील दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे महापालिकेनेही कारवाई न करण्याबाबतचा दिलासा दिला आहे. तरीही वर्तकनगर पोलिसांनी ही घरे रिक्त करण्याबाबत तगादा लावल्याने पोलीस कुटूंबीयांमध्ये तणावात आहेत.

Housing Minister gives relief to 'those' 40 police families in Thane; Still hanging sword | गृहनिर्माण मंत्र्यांचा ठाण्यातील ‘त्या’ ४० पोलीस कुटूंबीयांना दिलासा; तरीही टांगती तलवार

स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याची एक आठवडयाची मुदत

googlenewsNext
ठळक मुद्दे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याची एक आठवडयाची मुदत४० कुटूूंबीय प्रचंड तणावात

ठाणे: तांत्रिकदृष्ट्या अती धोकादायकमध्ये गणल्या गेलेल्या वर्तकनगर येथील १४ आणि १६ या दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे महापालिकेनेही कारवाई न करण्याबाबतचा दिलासा दिला आहे. तरीही वर्तकनगर पोलिसांनी मात्र निवासस्थाने रिक्त करण्याबाबत पुनरुच्चार केल्याने येथील ४० कुटूूंबीय प्रचंड तणावात आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीने म्हाडा वसाहतीमधील पोलीस निवासस्थाने असलेल्या या दोन इमारतींना धोकादायक इमारतीचे तांत्रिक परिक्षण अहवाल (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) तसेच स्थैर्यता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टीफिकेट) सादर करण्याची नोटीस चार महिन्यांपूर्वी बजावली होती. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत सी- २ बी (अर्थात रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे) या प्रवर्गात समाविष्ट केली. दरम्यान, ठामपाच्या पॅनलवरील एका वास्तुविशारदाकडून तांत्रिक परिक्षणही येथील रहिवाशांनी केले. मात्र, कोरोनामुळे दुरुस्तीची कामे अर्धवट राहिल्यामुळे स्थैर्यता प्रमाणपत्र मिळालेच नाही. त्यामुळे एक महिन्यापूर्वी दुसऱ्या वास्तुविशारदाकडून पदरमोड करुन रहिवाशांनी तांत्रिक परिक्षणही केले. दुरुस्तीही सुरु झाली. तोपर्यंत भिवंडीची दुर्घटना झाल्याने महापालिकेने (दुरुस्ती करुन राहण्यायोग्य असलेल्या) इमारतीला अतिधोकादायकचा फलक लावला. तसे पत्रही पोलीस प्रशासनाला दिले. त्याचआधारे वर्तकनगर पोलिसांनी ही घरे तातडीने रिक्त करण्याच्या नोटीसा बजावल्या. हीच कैफियत पोलीस कुटूंबीयांनी मांडल्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी यात मध्यस्थी केली. स्थैर्यता प्रमाणपत्र आणि किरकोळ दुरुस्ती करण्याच्या अटीवर कारवाई न करण्याचे ठामपाच्या सहायक आयुक्त पंडीत यांनी मान्यही केले. तरीही शनिवारी पुन्हा येथील पोलीस कुटूंबीयांना वर्तकनगर पोलिसांकडून घरे रिक्त करण्याचे फर्मान गेल्याने ऐन कोरोनासारख्या साथीच्या आजारात घरांचे स्थलांतर कसे करायचे? या तणावातच येथील कुटूंबीय आहेत. रविवारी पुन्हा या कुटूंबीयांनी आपली कैफियत मांडल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी चर्चेअंती घरे रिक्त करण्याच्या कारवाईला स्थगिती मिळविण्यात येईल, असे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी या कुटूंबीयांना दिले.

* या कारणांसाठी रहिवाशांचा नकार
इमारतीमध्ये एका अधिका-यासह आठ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. ठाण्यात डयूटीवरील कर्मचाऱ्यांना देऊ केलेली सिद्धी हॉल येथील पर्यायी वसाहतीची अवस्था या इमारतींपेक्षाही बिकट आहे. निवृत्त तसेच मृत पावलेल्या पोलीस कुटूंबीयांचा कोणताही विचार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे इमारत अतिधोकादायक नसून ती दुरुस्ती करुन राहण्यायोग्य असल्यामुळेच घरे रिक्त करण्याला रहिवाशांचा नकार आहे.

‘‘ इमारत क्रमांक १४ आणि १६ च्या रहिवाशांनी इमारतीचे स्थैर्यता प्रमाणपत्र दिल्यास त्यांच्यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही. परंतू, तांत्रिक परिक्षण अहवालात दर्शविल्याप्रमाणे इमारतीमध्ये दुरुस्ती करुन हे प्रमाणपत्र तातडीने देणे गरजेचे आहे. अन्यथा इमारत अतिधोकादायक यादीत समाविष्ट होऊ शकते.’’
अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका.
..............................

‘‘ कोविडमुळे तांत्रिक परिक्षण (स्ट्रक्चरल आॅडीट रिपोर्ट) अहवालात दर्शविलेली इमारतीची दुरुस्ती झाली नव्हती. ती सध्या करण्यात येत आहे. लवकरच महापालिकेत स्थैर्यता प्रमाणपत्रही सादर केले जाणार आहे. ठाणे महापालिकेने स्थैर्यता प्रमाणपत्र देण्यासाठी आठवडयाची मुदत दिली आहे. त्यामुळे वर्तकनगर पोलिसांनीही कोविडसारख्या गंभीर परिस्थितीमध्ये घरे रिक्त करण्याची कारवाई थांबविणे आवश्यक आहे.’’
प्रशांत सातपुते, शिवसेना विभागप्रमुख, वर्तकनगर, ठाणे (रहिवाशी इमारत क्रमांक १४)

 

 

Web Title: Housing Minister gives relief to 'those' 40 police families in Thane; Still hanging sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.