मुंब्रा बायपासवरील खड्ड्यांबाबत गृहनिर्माणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:40 AM2021-07-31T04:40:17+5:302021-07-31T04:40:17+5:30
ठाणे : मुंब्रा बायपासवर बुधवारी मध्यरात्री पाच फुटांचा मोठा खड्डा पडल्याने बायपासवरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने ...
ठाणे : मुंब्रा बायपासवर बुधवारी मध्यरात्री पाच फुटांचा मोठा खड्डा पडल्याने बायपासवरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने शुक्रवारी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. या कामाची चौकशी करून दोषी असलेल्या ठेकेदारावर कारवाईचे आदेशही त्यांनी बैठकीत दिले.
लोकमान्य नगर आणि मुंब्रा ठाकूरपाडा या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या घटना ताज्या आहेत. त्यात आता मुंब्रा बायपासवर मोठा खड्डा पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा चव्हाट्यावर आले. वारंवार मुंब्रा बायपासवर पडत असलेल्या खड्ड्यांमुळे आव्हाड चांगलेच संतापले. त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वारंवार असे खड्डे का पडत आहेत? रस्ते तयार होतात तेव्हा देखरेख केली जाते की नाही, याचा जाब विचारला. आव्हाड यांच्या प्रश्नांचे उत्तर काही अधिकाऱ्यांना देता आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर या कामाची चौकशी करून दोषी असलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच पावसाळा असल्याने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यास त्यांनी सांगितले.
चौकट - ४० कोटी खर्चून केले जाणार काम
मुंब्रा बायपासवर पडलेल्या खड्ड्यांचे काम तात्पुरत्या स्वरूपात आता केले जाणार आहे. परंतु पावसाळा संपल्यानंतर साधारणपणे सप्टेंबरपासून येथे काँक्रीटीकरणाचे पक्के काम केले जाणार आहे. यासाठी सुमारे ४० कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे.
मुंब्रा बायपासवरील टोल पुन्हा सुरू होणार
मागील चार वर्षांपासून मुंब्रा बायपासवरील टोलनाका बंद ठेवण्यात आला होता. या बायपासचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने हा टोलनाका बंद करण्याची मागणी झाली होती. त्यानंतर आता शुक्रवारी झालेल्या बैठकीत आव्हाड यांनी हा टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
..............
वाचली.