Maratha Reservation: संविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार?- जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 04:48 PM2018-11-14T16:48:19+5:302018-11-14T16:51:11+5:30
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मराठा आरक्षणावरही भाष्य केलं आहे.
ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मराठा आरक्षणावरही भाष्य केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत राहणार.
आरक्षण हा संविधानाचा भाग आहे. ज्या सरकारमधील मंडळींचा संविधानालाच वैचारिक विरोध आहे ते आरक्षण काय देणार?, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरही ते म्हणाले, विकासाच्या, प्रगतीच्या मुद्द्यावर आपल्याला मतं मिळणार नाही हे पंतप्रधानांना कळून चुकलंय, तेव्हा मग यांना रामाची आठवण झाली, मंदिर वही बनाऐंगे पर तारीख नही बतायेंगे, 2019ची निवडणूक जवळ येतेय, सगळे मुद्दे हे आता आपल्या विरोधात आहेत हे समजल्यावर आता भावनिक मुद्द्यांना हात घालणे हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. ठाणे शहरातील मूलभूत समस्या ठाणे महापालिकेने सोडविल्या नाहीत, आजही रस्ते, कचरा, पाणी, शौचालय यांसारख्या प्राथमिक प्रश्नांकडे पालिका दुर्लक्ष करत आहे, जुनंच ठाणे पालिकेला सांभाळत येत नाही, नवीन ठाणे कसे करणार? नवीन ठाण्याचे प्लॅंनिंग बिल्डरांसाठी आहे.
नवीन ठाणे करायचे असेल तर आधी या बिल्डर्सला बाहेर काढा. नवीन ठाण्याची संकल्पना ही 10 ते 12 वर्षांपूर्वी झालेली आहे. आज ठाण्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, येत्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवणार आहे, स्वतःचे धारण बांधता आले नाही. ठाणे महापालिकेची हद्द ठरली आहे मग नवीन ठाण्याचा प्रस्ताव कशासाठी आणलाय. हे सगळे प्लॅंनिंग कोणासाठी?, असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.