सराफ संघर्षाची गुढी उभारणार?
By admin | Published: April 8, 2016 01:26 AM2016-04-08T01:26:24+5:302016-04-08T01:26:24+5:30
देशभर सराफांचा संप सुरु असतानाच वसईतील मोठ्या सराफांनी ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर संपातून माघार घेऊन दुकाने सुरु केल्याने वसईतील सराफ संघटनेने संताप
विरार : देशभर सराफांचा संप सुरु असतानाच वसईतील मोठ्या सराफांनी ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर संपातून माघार घेऊन दुकाने सुरु केल्याने वसईतील सराफ संघटनेने संताप व्यक्त केला असून प्रेमाने ऐकत नसतील तर दुसऱ्या प्रकाराने वठणीवर आणण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्या वसई व पालघर जिल्ह्यात मोठे सराफ ंविरुद्ध छोटे सराफ असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात सराफांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात वसईसह पालघर जिल्ह्यातील १८०० सराफ सामील झाले आहेत. नवघर-माणिकपूर शहरात मुंबईतील पाच मोठ्या सराफांची दुकाने आहेत. मध्यंतरी पाचही सराफांनी संपात सहभाग घेतला होता. मात्र गुढीपाडव्याच्या तोंडावरच या पाच सराफांनी संपातून माघार घेत दुकाने दुकाने पुन्हा सुरु केली आहेत. इतर सराफांचा संप मात्र सुुरुच आहे.
केंद्र सरकारच्या धोरणाचा सर्वच दुकानदारांना फटका बसणार आहे. मोठ्या सराफांना विनंती केली तेव्हा त्यांनी संपात सहभाग घेतला होता. मात्र, गुढीपाडव्यामुळे त्यांनी दुकाने पुन्हा सुरु केली आहेत. त्यामुळे वसईत त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पुन्हा एकदा त्यांना प्रेमाने समजावून पाहिले जाईल. त्यांनी ऐकले नाही तर दुसऱ्या भाषेत धडा शिकवावा लागेल, असा इशारा वसई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विरेंद्र बोरा यांनी लोकमतशी बोलताना दिला. त्यामुळे पालघर जिल्ह्यात पोलिसांपुढे उद्या कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.