वॉर्डन चार महिने मानधनाविना, संसाराचा गाडा हाकायचा कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:36 AM2019-02-21T05:36:03+5:302019-02-21T05:36:36+5:30
कुटुंब हवालदिल : संसाराचा गाडा हाकायचा कसा?
उल्हासनगर : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना मदत करणारे वॉर्डन मागील चार महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. पालिकेकडून वेळेत पगार होत नसल्याने वॉर्डन यांच्या कुटुंबाची वाताहत होत असून वेळेत मानधन देण्याची मागणी वाहतूक विभागाने केली आहे.
उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. नागरिकांनादिलासा देऊन वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने महापालिकेला वॉर्डन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पालिकेने वाहतूक विभागाला ४० व त्यानंतर एकूण ७५ वॉर्डन नियुक्तीला वाहतूक विभागाला परवानगी दिली. एका वॉर्डनला दरमहा चार हजार मानधन सुरुवातीला दिले जात होते. मात्र, ते पुरेसे नसल्याची मागणी वाहतूक विभागाकडून आल्यावर तीन महिन्यांपूर्वी मानधन चारवरून सहा हजार करण्यात आले. महापालिकेकडून दरमहा मानधन दिले जात नसल्याने वॉर्डनच्या कुटुंबाची वाताहत होत असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.
महापालिका वाहन विभागाचे व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी वॉर्डन यांचे दरमहिन्याला मानधनाचे बिल लेखा विभागाकडे पाठवत असल्याची माहिती दिली. तर, मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
शहर वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक घेटे यांनी वॉर्डनचे मानधन दरमहा काढण्याची विनंती पालिकेकडे केली आहे. महापालिकेने ७५ वॉर्डनबरोबरच जॅमर व इतर सुविधा वाहतूक विभागाला दिल्या आहेत. मात्र, कोंडी सुटण्याऐवजी परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. वॉर्डनचा ड्युटी अहवाल वाहतूक पोलीस विभाग पालिकेला नियमित देत नसल्याचे वाहतूक व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी सांगितले.
चौक, गर्दीच्या ठिकाणाहून वॉर्डन गायब
महापालिकेने शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तब्बल ७५ वॉर्डन घेण्यास वाहतूक विभागाला परवानगी दिली. मात्र चौक, रस्ते, गर्दीची ठिकाणे, मुख्य बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी वॉर्डनची नेमणूक केली. मात्र, बहुतांश ठिकाणचे वॉर्डन गायब असल्याचे चित्र शहरात आहे.