मराठी साहित्यिकांची पुस्तके घरी नसतील तर तुम्ही मराठी कसे: कविवर्य अशोक नायगांवकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 05:57 IST2025-03-29T05:56:41+5:302025-03-29T05:57:12+5:30

"मराठीने आधुनिकतेशी जोडून घेणे गरजेचे"

How can you learn Marathi if you don't have books by Marathi writers at home: Poet Ashok Naigaonkar | मराठी साहित्यिकांची पुस्तके घरी नसतील तर तुम्ही मराठी कसे: कविवर्य अशोक नायगांवकर

मराठी साहित्यिकांची पुस्तके घरी नसतील तर तुम्ही मराठी कसे: कविवर्य अशोक नायगांवकर

लोकमत न्यूज नेटवर्क , ठाणे : मराठीचा इतिहास माहीत नसेल, तुमच्या घरात मराठीतील नामवंत साहित्यिकांची पुस्तके नसतील तर तुम्हाला मराठी असूनही मराठी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. आजच्या काळातील पिढीचा कोणाही साहित्यिकांशी संबंध राहिलेला नाही. कुसुमाग्रजांनी मराठीची जी अवस्था आपल्या कवितेतून मांडली आहे, त्या अवस्थेला आपणच कारणीभूत आहोत. त्यामुळे वीस वर्षांनंतर पुढचे दिवस कठीण असतील, अशी खंत ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली. 

लोकमत साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने कोरम मॉल येथील कविवर्य कुसुमाग्रज ग्रंथदालन येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी नायगांवकर, ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे, ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे, चतुरस्र अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते झाले. कोरम मॉलचे सेंटर हेड विकास लध्धा, नियोजन समितीच्या डॉ. प्रतीक्षा बोर्डे, प्रकाश बोर्डे, दुर्गेश आकेरकर, निशिकांत महांकाळ या वेळी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगताबरोबर कविता सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. नायगावकर म्हणाले की, मराठीचा ‘म’ मॉलमध्ये आणण्याचे ऐतिहासिक काम लोकमतने केले. आधुनिकतेशी मराठीची नाळ जुळणे महत्त्वाचे आहे.

मॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केल्यामुळे येथे येणाऱ्या लोकांच्या कानावर मराठी शब्द पडतील. इंग्रजांनी वखारी सुरू केल्या. मराठी माणसांच्या वखारी जगभर आहेत. मराठीने आधुनिकतेचे स्वागत करीत जगभरातील मराठी माणसांसोबत जोडून घेतले पाहिजे. त्यानंतर त्यांनी मुळाक्षरांवर आधारित ‘तेव्हा आणि आता’ व ‘गाझापट्टी म्हणते बघा आम्ही गाठले लक्ष्य’ या कविता सादर केल्या. भीमराव पांचाळे म्हणाले की, लोकमतने पुस्तकांच्या या दुनियेत मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दवणे यांच्या भाषणाचा धागा पकडत पांचाळे म्हणाले की, शब्दांना गृहीत धरू नका हे दवणे यांचे म्हणणे योग्य आहे. कारण जगताना आपण शब्दांचा आधार घेतो, परंतु आपण आता शब्दांना गृहीत धरू लागलो आहोत. या वेळी त्यांनी ‘वाचलेली ऐकलेली, माणसे गेली कुठे?’ ही गझल सादर केली. 

प्रवीण दवणे म्हणाले की, कोरम आज खऱ्या अर्थाने शब्दमय झाले. बाह्य सुखाच्या, सुगंधाच्या अनेक गोष्टी जिथे मिळतात तेथे आंतरसुखाच्या म्हणजेच साहित्यविषयक पुस्तके उपलब्ध करून दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कागदोपत्री मिळाला तरी तो दर्जा काळजोपत्री मिळाला पाहिजे. मराठी भाषा आपल्या रक्ताची, जीवनाची, हिमोग्लोबिनची जीवनभाषा झाली पाहिजे. अभिजात भाषेला पंचारती ओवाळण्यापेक्षा एक संवेदनाची ज्योत रुजवावी, अशी अपेक्षा दवणे यांनी व्यक्त केली. त्यांनी ‘शब्द गृहीत धरत नाहीत’ ही कविता सादर केली. लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी लोकमत साहित्य पुरस्कार व महोत्सव आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. मॉलमध्ये मराठी पुस्तकाचे दुकान चालवणे परवडेल की नाही हे माहीत नाही. पण या महोत्सवाच्या निमित्ताने मराठी पुस्तकेच विकली जातील अशी अट घातली आहे. शैलेश वझे आणि त्यांची टीम यांनी उत्तम पुस्तके या ग्रंथ प्रदर्शनात आणली आहेत. पुढच्या वर्षी एक आठवड्याचा ग्रंथ महोत्सव आयोजित केला जाईल, असे यावेळी त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप प्रधान यांनी केले. 

पुढील वर्षीचा सोहळा गोरेगावमध्ये घ्या : पाठक

संदीप पाठक म्हणाले की, एखादी संकल्पना डोक्यात आली तर त्याला हिरवा कंदील दाखवण्याचे काम दर्डा कुटुंबीय करतात. लोकमत परिवार हा साहित्य आणि कलेसाठी धडपडणारा समूह आहे. मी लहानाचा मोठा लोकमत वर्तमानपत्र वाचत झालो. आपण मोठे होण्यामागे शाळा, कुटुंब, साहित्य, वर्तमानपत्र हे अविभाज्य घटक असतात. त्यांनी इंद्रजित भालेराव यांची ‘माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता’ ही कविता सादर केली. 
लोकमतचा हा साहित्यिक महोत्सव पुढील वर्षी गोरेगाव येथील मॉलमध्ये घ्या. आम्ही सगळे कलाकार ताकदीने लोकमतच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही पाठक यांनी दिली.

Web Title: How can you learn Marathi if you don't have books by Marathi writers at home: Poet Ashok Naigaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.