रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासायचा कसा?, ‘दक्षता, गुणनियंत्रण’पुढे पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:49 AM2017-10-26T03:49:23+5:302017-10-26T03:49:34+5:30
कल्याण : रस्ते दुरुस्तीच्या कामांचा गुणात्मक दर्जा राखण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत.
कल्याण : रस्ते दुरुस्तीच्या कामांचा गुणात्मक दर्जा राखण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी या कामांची गुणवत्ता कशी तपासायची, असा पेच केडीएमसीच्या दक्षता व गुणनियंत्रण विभागापुढे उभा राहिला आहे. या विभागाच्या प्रमुखांनी याबाबत मौन बाळगले असलेतरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांची चांगलीच कसरत होत आहे.
सध्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. गणपती, दसरा आणि त्यापाठोपाठ दिवाळीतही खड्डे कायम होते. आता पावसाने विश्रांती घेतल्याने कल्याण-डोंबिवलीतही रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. डांबरीकरणाने खड्डे भरले जात आहेत. परंतु, रस्ते दुरुस्ती करताना कामांचा गुणात्मक दर्जा व कामांच्या व्याप्तीबाबत योग्य ती खबरदारी घ्या, अशा सूचना आयुक्त वेलरासू यांनी शहरअभियंते प्रमोद कुलकर्णी यांना दिल्याआहेत. त्यादृष्टीने कुलकर्णी यांनी अभियंत्यांना सूचना केल्या आहेत. रस्तेदुरुस्ती करताना खड्ड्यांच्या परिघानुसार चारही बाजूंचे सरळ रेषेत खोदकाम करून आखणी करण्याबाबत सांगितले आहे. त्याचबरोबर रस्ते दुरुस्तीच्या कामांचा गुणात्मक दर्जा राखण्यासाठी आणि त्रयस्थ अभियंत्यांमार्फत परिणामांची पडताळणी करण्याकरिता कल्याण विभागासाठी तरुण जुनेजा आणि डोंबिवली विभागासाठी घनश्याम नवांगुळ या कार्यकारी अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या त्रयस्थ अभियंत्यांचा आणि दक्षता व गुणनियंत्रण विभागाचा समाधानकारक अहवाल आल्यानंतरच या कामांची बिले मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
परंतु, दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि लॅब टेक्निशन आदी तिघांचेच मनुष्यबळ आहे. त्यांना कल्याण-डोंबिवली अशा स्वतंत्र विभागासाठी प्रत्येकी एका कनिष्ठ अभियंत्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या विभागाची अपुºया मनुष्यबळामुळे काम करताना धावपळ उडत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामांचा दर्जा योग्य प्रकारे राखण्यासाठी नमुने घेतले जात आहेत. येथील प्रयोगशाळेत त्यांची तपासणी होत असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
>...अन्यथा चाबूक घेणार
केडीएमसीने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरु वात केली आहे. परंतु, हे काम संथगतीने सुरू असल्याने महापौर राजेंद्र देवळेकर संतप्त झाले आहेत. प्रशासनाने कामात गती न आणल्यास आम्हाला चाबूक हातात घेऊन त्यांच्यामागे लागावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली अहे.
महापौरांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला रात्री स्वत: कल्याण शहरातील काही भागांमध्ये फिरून अधिकाºयांकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करून घेतले होते. देवळेकर यांनी १५ दिवसांत संपूर्ण कल्याण-डोंबिवली खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी देवळेकर यांनी अचानक मंगळवारी मध्यरात्री दौरा केला. मात्र, अत्यंत धीम्या गतीने चाललेल्या कामांमुळे ते चांगलेच संतापले आहेत. प्रामुख्याने आयुक्तांनी या कामांची पाहणी करणे आवश्यक असताना ते मात्र अद्यापही फिरकलेले नाहीत. त्यात, कामास विलंब होत असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.