प्रज्ञासिंग ठाकूरला कॅन्सर नसताना जामिन कसा दिला? आ. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 08:43 PM2019-04-25T20:43:51+5:302019-04-25T20:44:03+5:30
राष्ट्रवादी काँग्रेेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन प्रज्ञासिंग ठाकूर हिच्या बोगस आजारपणाचे बिंग फोडले आहे.
ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन प्रज्ञासिंग ठाकूर हिच्या बोगस आजारपणाचे बिंग फोडले आहे. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. लहाने आणि डॉ. शेंबे यांनी प्रज्ञासिंग हिला कॅन्सर नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही, आजारपणाच्या मुद्यावर तिला जामीन कसा मंजूर करण्यात आला? असा सवाल आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
मालेगाव आणि नांदेड बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर हिने कॅन्सर असल्याचा दावा करुन एनआयए कोर्टातून जामीन मिळवला आहे. तिचा हा दावा बनावट असल्याचा खुलासा डॉ. लहाने आणि डॉ. शेंबे यांनी केला आहे. तीला कर्करोगच नाही तर कुठलाच आजार नव्हता, असे या दोघांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या खुलाश्याचा आधार घेऊन आ. आव्हाड यांनी हे ट्वीट केले आहे. जर, प्रज्ञासिंग हिला कोणताही आजार नव्हता तर अटकेतली 9 वर्षामधील 6 वर्षे ती हॉस्पिटलमध्ये कशी राहू शकली? पोलिस, तपास यंत्रणांनी, न्यायालयाने, डॉक्टरांनी त्यावर आक्षेप का घेतला नाही. असा कुठला राजकीय दबाव होता आणि न्यायालयानेही आजारपणाचा दाखला देत तीला जामीन कसा काय दिला ? दुसरीकडे छगन भुजबळ हे वेदनांनी अस्वस्थ होते; त्यांना यकृताचा गंभीर आजार झाला होता. तरीही, क्षणाक्षणाला त्यांना त्रास दिला जात होता. उपचारांची गरज असतानाही त्यांना रुग्णालयाऐवजी तरुंगात पाठवून सरकार त्यांच्या मरणाची वाट पहात होते, असा आरोप ट्वीटच्या माध्यमातून करुन, प्रज्ञासिंग ठाकूर ला एक न्याय आणि छगन भुजबळ यांना दुसरा न्याय का केला. याबाबत चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.