वारेमाप वीजबिले आली कशी?- रवींद्र चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:33 AM2020-08-14T00:33:37+5:302020-08-14T00:33:44+5:30
महावितरणच्या विभागीय अभियंत्यांकडे विचारणा
डोंबिवली : वाढीव वीजबिले, सतत वीजपुरवठा खंडित होणे, यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ज्यांना ५०० रु पये बिल येत होते, त्यांना आता पाच हजार रुपये बिल येत आहे. अशी वारमाप वीजबिले कशी येत आहेत? त्यामुळे एखादी चांगली योजना आणून त्यांना दिलासा द्या. विजेच्या संदर्भात दिल्ली पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा या राज्य सरकारने केली होती. ही घोषणा कागदावर राहिली का, असा सवाल आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला.
वीजसमस्या, वीजबिलांबाबत चव्हाण यांनी गुरुवारी महावितरणच्या कल्याण येथील तेजश्री कार्यालयात विभागीय अभियंता दिनेश अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला.
यावेळी चव्हाण म्हणाले, विविध समस्यांसंदर्भात आम्ही महावितरणला पत्रे पाठवली, पण त्याला उत्तरही मिळत नाही. प्रत्येक बैठकीचे आम्हाला इतिवृत्त हवे आहे. महावितरणने बिल भरण्यासाठी ग्राहकांना तगादा लावणे चुकीचे आहे. खंबाळपाडा, कांचनगाव येथे दिवसातून सात वेळा वीज खंडित होते. मी राज्यमंत्री असताना अखंड वीजपुरवठ्यासाठी मेरी गो राउंड पद्धतीने सर्व व्यवस्था केली, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. वीज खंडित होण्याचा अहवाल आम्हाला हवा. विजेअभावी नागरिकांना घरून कामे करता येत नाहीत. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
त्यावर अग्रवाल म्हणाले की, खंबाळपाडा विभागात सात ठिकाणी समस्या येत आहे. त्याबाबत गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याकरिता शुक्र वारी दिवसभर शटडाउन घेण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात कोणाचेही वीजमीटर काढू नका
भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी उपअभियंता अधिकारी नितीन दुपहारे यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी केली.
गणेशोत्सवात वीजबिलांमुळे कुणाचेही मीटर काढल्यास, त्यामुळे होणाºया परिणामांना केवळ महावितरण जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी खंबाळपाडा प्रभागाचे नगरसेवक साई शेलार यांनीही नागरिकांच्या समस्या मांडल्या.