ठाण्यात अॅथलेटस घडणार तरी कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:26 AM2018-08-29T04:26:59+5:302018-08-29T04:27:52+5:30
ठाण्यात सोयीसुविधा नसतानाही चांगले अॅथलेट्स घडत आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्यांची संख्या रोडावली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्पर्धा घ्यायची वेळ आली, तर ती मुंबईत घ्यावी लागते. ठाणे शहरासाठी ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. दादोजी कोंडदेव क्रीडागृह अॅथलेटिक्ससाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. कौसा येथे आजही परवानगी दिली जात नाही. तेथील ट्रॅक अॅथलेट्ससाठी उपयोगाचा नसल्याची खंत ठाण्यातील अॅथलेक्टिस कोच अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
अॅथलेट्ससाठी ठाण्यात कोणत्याही सोयीसुविधा नसून ही परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न अजित कुळकर्णी यांनी वेळोवेळी केला. ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत आहे. त्याअनुषंगाने ठाणेकरांना अनेक स्मार्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत. परंतु ठाण्याने खेळाडूंच्या सुविधांसाठी म्हणावे तेवढे प्रयत्न केले नाहीत. दादोजी कोंडदेव क्रीडागृहात पूर्वी सिंथेटीक ट्रॅक उपलब्ध होता. आता त्याची दुरवस्था झाली असून, तो सराव करण्यायोग्य राहिलेला नाही. तीन ते चार महिन्यांपासून क्रिकेटसाठी या ट्रॅकचा वापर होत असून, संपूर्ण स्टेडिअमच अॅथलेट्ससाठी बंद करण्यात आले आहे. मुंब्य्रातील कौसा येथे मोठ्या दिमाखात स्टेडिअम उभारले आहे. तेथील ट्रॅकचा वापर केवळ मॉर्निंग वॉकसाठी होत असून, सरावासाठी अद्यापही तिथे परवानगी दिलेली नाही. महत्प्रयासाने एकदाच त्याठिकाणी सरावाची संधी मिळाली होती. परंतु ठाण्यातील खेळाडूंना तिथे जाण्या-येण्यातच चार तास घालवावे लागले. प्रवासातच एवढा वेळ जात असेल, तर त्यांनी सराव कधी करावा, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे ठाण्यातील खेळाडूंना मुंबईला किंवा पुण्यातील बालेवाडीला नाईलाजाने जावे लागते. त्यातही काही अडचणी आहेत.
मुंबई विद्यापीठात सरावाला गेल्यास तिथे प्रथम प्राधान्य त्यांच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. एकूणच ठाण्यात चांगले अॅथलेट्स घडू शकतात. परंतु त्यांना सराव करण्यासाठी जागा आणि पूरक सोयीसुविधासुध्दा उपलब्ध नाहीत. मागील ११ वर्षांपासून अॅथलेट्ससाठी सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु त्याला यश मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्याची स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा ठाण्यात होणे अपेक्षित होते. परंतु ती सोयीसुविधांअभावी मुंबईला घ्यावी लागली. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, बहुतांश पालक मुलांच्या क्रीडागुणांना महत्त्व देण्याऐवजी अभ्यासावरच जोर देतात. याशिवाय खेळाडूंना नोकरीच्या संधी कमी आहेत. एलआयसीमध्ये खेळाडूंना संधी मिळते, रेल्वेत बऱ्याच मर्यादा आहेत. नोकरीच्या संधी वाढविण्याची गरज आहे. शहरी भागात सोयीसुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने आम्ही मित्रमंडळीसह ग्रामीण भागात जाऊन खेळाडूंना तयार करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे अजित कुळकर्णी यांनी सांगितले.
अजित कुलकर्णींची खंत
ठाण्यातील अॅथलेट्समध्ये भरपूर ऊर्जा आहे. उच्च दर्जाचे खेळाडू येथे घडू शकतात. या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात ठाण्याचा नावलौकिक होऊ शकतो. मात्र त्यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.