निवडणुकीला सामोरे जायचे तरी कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:33+5:302021-03-04T05:16:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण - डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व माजी आमदार जगन्नाथ (अप्पा) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण - डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व माजी आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांची, तर कार्याध्यक्षपदी डॉ. वंडार पाटील यांची नोव्हेंबरमध्ये नियुक्ती करण्यात आली. परंतु, या नियुक्तिला तीन महिने उलटूनही नव्या कार्यकारिणीला मुहूर्त मिळालेला नाही. केडीएमसी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणे आवश्यक असताना त्यासंदर्भात कोणतीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, निवडणुकीला सामोरे जायचे तरी कसे? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
केडीएमसीची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली आहे. स्थानिक पातळीवर २५ वर्षे मनपात शिवसेना सत्तेत आहे. येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती समाधानकारक नाही. सन २०१५ च्या मनपा निवडणुकीत या दोन्ही पक्षांचा दारूण पराभव झाला. यात काँग्रेसने चार, तर राष्ट्रवादीने अवघ्या दोन जागांवर विजय मिळविला. त्यामुळे आगामी निवडणूक पाहता पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागले पाहिजे, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. परंतु, तसे चित्र पाच वर्षांत दोन्हीकडे पाहायला मिळालेले नाही.
दरम्यान, शिंदे आणि पाटील यांची राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीकोनातून वेगाने हालचाली होतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. परंतु, केवळ बैठकांच्या पलिकडे कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यात तीन महिने उलटूनही नवीन कार्यकारिणी जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. रमेश हनुमंते यांना पदावरून दूर करून संयमी आणि सक्षम चेहरा शिंदे यांच्या रूपाने जिल्हाध्यक्षपदी देण्यात आला आहे. मात्र, तीन महिन्यांत फारशी उजवी कामगिरी न दिसल्याने ‘कालचा गोंधळ बरा होता,’ अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
---------------------------------
घरापासूनच सुरुवात करावी
- केडीएमसीची निवडणूक पाहता पक्ष संघटना मजबूत करण्यावर प्राधान्य असेल असे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी स्पष्ट केले होते. त्यांचे पुतणे नीलेश शिंदे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन पक्षवाढीसाठी घरापासूनच सुरुवात करावी, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
- त्यात दोघांच्या बैठका एकाच कार्यालयात होत असल्याने आपल्याविषयी उगाच शंका नको, म्हणून कार्यकर्तेही तिकडे फिरकत नाहीत. यात पक्षाचे नुकसान होत असल्याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून लक्ष वेधले जात आहे.
----------------------------------
कार्यकारिणी लवकरच जाहीर करू
- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. मध्यंतरी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने विलंब झाला असून, त्यांची संमती घेऊन लवकरच कार्यकारिणी जाहीर केली जाईल.
- नीलेश शिंदे हे शिवसेनेत असले तरी आता आमची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे फारसा फरक पडत नाही. काही कारणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता पुन्हा त्यांनी स्वगृही परतावे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
- आमची कार्यालये एकच असली तरी मी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्तेही येतात. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यालयात येताना शंका उपस्थित होते, असे म्हणणे चुकीचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण - डोंबिवली जिल्हाध्यक्ष व माजी आ. जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांनी स्पष्ट केले.
------------------------